चतुर्थीला महाराष्ट्रातून होते पुरोहितांची आयात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:26 PM2018-09-18T12:26:44+5:302018-09-18T12:35:01+5:30

आराध्य दैवत तसेच प्रत्येकाला प्रिय असलेल्या गणेश चतुर्थीच्या सणाला गोवेकरांना पुरोहित मिळणे दुरापास्त झाल्याने तसेच दरवर्षी गणेश भक्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोवेकरांसाठी महाराष्ट्रातून पुरोहित चतुर्थीला आयात करण्याची वेळ आली आहे.

for ganesh chaturthi, goa need priest from maharashtra | चतुर्थीला महाराष्ट्रातून होते पुरोहितांची आयात 

चतुर्थीला महाराष्ट्रातून होते पुरोहितांची आयात 

Next

म्हापसा : आराध्य दैवत तसेच प्रत्येकाला प्रिय असलेल्या गणेश चतुर्थीच्या सणाला गोवेकरांना पुरोहित मिळणे दुरापास्त झाल्याने तसेच दरवर्षी गणेश भक्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोवेकरांसाठी महाराष्ट्रातून पुरोहित चतुर्थीला आयात करण्याची वेळ आली आहे. चतुर्थीसाठी गोवेकरांची गरज भागवून आणलेले पुरोहित मंगळवारी सकाळी परतीच्या वाटेवर निघून गेले.  

गोव्यात दरवर्षी सार्वजनिक गणोशोत्सवासोबत घरातील गणपतीची पूजा करणा-या भक्तांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात घरात गणपतीची पूजा करणा-यांची संख्या लाखाच्या घरात गेली आहे. वाढत्या संख्येबरोबर पुरोहितांची वाढती गरज भागवण्यासाठी म्हणावे त्या प्रमाणे पुरोहीत उपलब्ध नसल्याने त्यांच्या तुटवडा भासू लागला आहे. ब-याच पुरोहितांनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडून इतर प्रकारच्या व्यवसायाला प्राधान्य दिल्याने तुटवडा भासण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. त्यामुळे पुरोहित आयात करण्यात आले होते.  

आयात केलेले पुरोहित चतुर्थीच्या दोन दिवस अगोदर दाखल व्हायला सुरुवात होतात. त्यांची संख्याही बराच मोठी असते. महाराष्ट्रातील पढंरपूर, नांदेड, कोल्हापूर, नाशिक सारख्या भागातून पुरोहित आणले जातात. तसेच कर्नाटकातील गोकर्ण, अंकोला या भागातून सुद्धा आणले जातात. चतुर्थीच्या काळातील त्यांचा वास्तव्याचा कालावधी पाच ते सात दिवसापर्यंतचा असतो. राज्यातील जास्त प्रमाणावरील गणपती पाच दिवसांचे असल्याने किमान पाच दिवसानंतर ते माघारी निघून जातात. यंदा सुद्धा चतुर्थीसाठी आणलेले बहुतेक पुरोहित मंगळवारी सकाळी परतीच्या वाटेवर निघून गेले. त्यांच्या राहण्यापासून ते इतर सर्व प्रकारची त्यांची व्यवस्था केली जाते. त्यांना आणण्यापूर्वी त्यांना देण्यात येणारी रक्कम सुद्धा निश्चित केलेली असते. 

सरासरीवर एक पुरोहीत जास्तीत-जास्त शंभर गणपतीचे पूजन दर दिवशी करीत असतो. पहाटे ४ वाजल्या पासून सुरू केलेली पूजा संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असते. चतुर्थी नंतर दुस-या पंचमीच्या दिवशी अभिषेक करण्यात येत असतो. दुस-या दिवशीही पहिल्या दिवसा प्रमाणे उशीर होत असतो. दीड दिवस गणपतीच्या विसर्जनानंतर काही लोकांच्या घरात सत्यनारायण पूजेचे आयोजनही केले जाते. पुरोहीतांच्या सोयीनुसार सत्यनारायण पूजेचा वेळ ठरवण्यात येतो. त्यातून होणारा हा उशीर पुरोहितांच्या कमतरतेमुळे अटळ असतो. होत असलेल्या उशीरामुळे दुपारचा नैवेद्य संध्याकाळच्यावेळी ग्रहण करणे भाग पडत असते. 

गोव्यातील ब-याच गावांत असलेल्या देवस्थानच्या पुजा-यावर संबंधीत गावातील गणेश पूजन करण्याची जबाबदारी असते. गाव मोठा असला तर त्यांना दुस-या पुरोहिताचा वापर केल्या शिवाय पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे ही आयात करणे भाग पडत असते. पुरोहितांची आयात करून सुद्धा अनेकांना वेळेवर पुरोहित मिळत नसल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी भक्तांनी कॅसेटचा वापर करायला सुरुवात केली. तर काही गावांनी स्वत:हून पूजा करण्यावर भक्तांनी भर दिला आहे. त्यामुळे घरात वेळेवर सगळी देवकृत्ये होत असतात अशी माहिती काही लोकांनी दिली.

गावातील सगळ्या लोकांशी सलोख्याचे संबंध असल्याने चतुर्थीला त्यांची गरज वेळेवर भागवावी लागते. त्यामुळे दरवर्षी किमान २५ पुरोहितांची गरज भासत असल्याची माहिती पुरुषोत्तम जोशी यांनी दिली. निर्धारीत वेळेत सगळ्यांच्या पूजा करणे शक्य होत नसल्याने गरज भागवण्यासाठी इतर राज्यातून पुरोहित आणावे लागतात. सगळ्यांच्या पूजा वेळेवर करुन द्याव्या लागतात असेही ते म्हणाले.  

Web Title: for ganesh chaturthi, goa need priest from maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.