अन्न व औषध प्रशासन अधिकार्‍यांचे खांडेपार-उसगावात छापे
0- सुमारे ५९ हजार रुपये किमतीचे खाद्यपदार्थ, गुटखा जप्त
0- जप्त केलेल्या मालाची तिथेच आग लावून विल्हेवाट
0- गलिच्छ वातावरणात खाद्यपदार्थ बनविणार्‍यांना चाप
फोंडा : गुरुवारी सकाळी अन्न व औषध प्रशासन खात्याचे अन्न सुरक्षा अधिकारी राजीव कोरडे व फ्लाविया डिसोझा यांनी तिस्क उसगाव आणि खांडेपार भागात ४ दुकानांवर छापा टाकून सुमारे ५९ हजार रुपये किमतीचा खाण्यायोग्य नसलेले खाद्यपदार्थ, तसेच मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला. जप्त करण्यात आलेला खाद्यपदार्थ तसेच गुटख्याची आग लावून विल्हेवाट लावण्यात आली. अधिकार्‍यांनी छापा टाकलेली चारही दुकाने सील केली आहेत.
धावशिरे-उसगाव येथील इक्बाल खान यांच्या मालकीच्या बेकरीवर गुरुवारी सकाळी अधिकार्‍यांनी छापा टाकून शेव, फरसाण, बिस्किट, कुरकुरे, टोस्ट असे सुमारे ३0 हजार रुपये किमतीचा माल जप्त केला. हा बेकरीमालक गेल्या ६ वर्षांपासून विना परवाना खाद्यपदार्थ बनवून त्यांच्यावर बनावट लेबल लावून त्याची विक्री करीत असल्याचे अधिकार्‍यांना आढळले. या बेकरीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही आढळून आली. बेकरीच्या अन्य खोलीत चुनिस खान हा खाद्यपदार्थांची पाकिटे बनविताना आढळून आला.
या बेकरीत अस्वच्छ वातावरणात बनवलेल्या बिस्कीट, कुरकुरे, फरसाण या खाद्यपदार्थांची सायकलवर फिरून विक्री केली जाते. लहान मुले मोठ्या प्रमाणात या खाद्यपदार्थांची खरेदी करतात. यासंबंधी माहिती मिळाल्यावर लहान मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या संचालकांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे कोरडे यांनी या वेळी सांगितले.
अवंतीनगर-तिस्क येथे भाड्याच्या खोलीत राहाणार्‍या मंगू सिंग याच्या खोलीत अधिकार्‍यांनी छापा टाकला असता आरएमडी, सचिन गुटखा, स्टार गुटखा, तंबाखू पाकिटे, विविध ब्रँडच्या विड्या असा सुमारे १८ हजार ५00 रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. हा माल जप्त करून अधिकार्‍यांनी जवळच त्याची आग लावून विल्हेवाट लावली.
त्यानंतर अवंतीनगर येथेच अन्य एका भाड्याच्या खोलीत राहून भेलपुरी बनविणार्‍या संजय कुमार याच्याकडून अंदाजे २ हजार ५00 रुपयांचा शेव व पुर्‍या जप्त करण्यात आल्या. खाद्यपदार्थ बनविताना कोणतीही सुरक्षाविषयक काळजी न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली.
त्यानंतर खांडेपार येथील झब्रास्तीयन नादीर यांच्या मालकीच्या रॉयल स्वीट्सवर अधिकार्‍यांनी छापा टाकून ८ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला. नादीर यांच्याकडे खाद्यपदार्थ बनविण्याचा परवाना आहे. मात्र, त्यांच्याकडे कोणतेही लेबल नसलेले खाद्यपदार्थ आढळून आल्याने जप्तीची व विल्हेवाटीची कारवाई करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)