गोव्यामध्ये भाजपा नेत्यांचा अस्तित्वासाठीचा लढा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 02:11 PM2018-11-09T14:11:52+5:302018-11-09T14:15:51+5:30

गुरुवारी भाजपाचे आमदार अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या म्हापशातील निवासस्थानी भाजपाच्या जेष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली.

The fight for the existence of BJP leaders in goa | गोव्यामध्ये भाजपा नेत्यांचा अस्तित्वासाठीचा लढा 

गोव्यामध्ये भाजपा नेत्यांचा अस्तित्वासाठीचा लढा 

Next
ठळक मुद्देजेष्ठ नेत्यांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यावर पक्षाकडून गंभीरपणे विचार करण्याची गरज मनोहर पर्रीकर आजारी झाल्यापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडायला सुरुवात फेरबदलानंतर डिसोझा यांनी पक्षावर आपली उघडपणे नाराजी व्यक्त केली

म्हापसा - गोव्यात पक्षाच्या उभारणीपासून ते पक्षाला सत्ता मिळवून देईपर्यंत भाजपातील ज्या नेत्यांनी कसून मेहनत घेतली. दिवस रात्र काम करुन पक्षाला सत्ता मिळवून दिली अशा नेत्यांना पक्षातून दूर सारुन त्यांना विश्वासात न घेता घेण्यात येत असलेल्या निर्णयावर वेळीच आवर घालण्याचा जेष्ठ नेत्यांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यावर पक्षाकडून गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. या मागणी सोबत पक्ष संघटनेत फेरबदलाची मागणी करणाऱ्या या जेष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावर विचार न केल्यास या नेत्यांची भूमिका भाजपाच्या पुढील वाटचालीसाठी परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. गुरुवारी भाजपाचे आमदार अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या म्हापशातील निवासस्थानी भाजपाच्या जेष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर इशारा देणारे हे सर्व नेते आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी लढा देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 या बैठकीला त्यात माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी उद्योग मंत्री महादेव नाईक, माजी कला व संस्कृतीक मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी सभापती अनंत शेट उपस्थित होते. सदरची बैठक होवू नये यासाठी निष्फळ ठरलेले सर्वतोपरी प्रयत्न सुद्धा पक्षाच्यावतीने करण्यात आलेले. नेत्यांची मने वळवण्याची प्रयत्न त्यातून करण्यात आलेले; पण त्याला हवे तसे यश लाभू शकले नव्हते. बैठकीनंतर थेट प्रदेशाध्यक्ष तेंडलकर यांच्या कार्यपद्धतीवर सर्व जणांनी आपला राग व्यक्त केला. पार्सेकर यांनी सर्वांच्या वतिने बोलताना पक्ष संघटनेत फेरबदलाची मागणी केली. मांद्रेकर यांनी प्रदेशाध्यक्षांमुळे पक्षाची गाभा समिती असून नसल्या सारखी असल्याचे मत व्यक्त करुन सर्वांना विश्वासात घेवून निर्णय घेण्याची मागणी केलेली. यावरुन सर्वकाही ठिक नसल्याचे स्पष्ट झालेले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी झाल्यापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली. म्हापसा मतदारसंघाचे आमदार माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा तसेच विधानसभेच्या निवडणुकीपूर्व काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केलेले माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांना मंत्रीपदावरुन डच्चू देण्यात आल्यानंतर राजकीय या घडामोडींना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ज्यावेळी मंत्रीमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय झाला त्यावेळी डिसोझा यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरु होते तर मडकईकर यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. 

फेरबदलानंतर डिसोझा यांनी पक्षावर आपली उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. अमेरिकेतील उपचार संपवून गोव्यात परतले असले तरी त्यांची नाराजी मात्र कायम आहे. आजही ते पक्षाविरोधात उघडपणे बोलत आहेत. राज्यात अल्पसंख्यांक समाजातील लोकांना भाजपाच्या बाजूने वळवण्यासाठी तसेच त्या समाजातील लोकप्रतिनिधींना निवडून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली अशा डिसोझा यांनी पक्षावर व्यक्त केलेली नाराजी सुद्धा स्पष्ट होती. मडकईकर यांना जडलेल्या आजारमुळे ते उघडपणे बोलू शकले नसले तरी ते बोलण्या एवढे सक्षम असते तर कदाचीत डिसोझाप्रमाणे त्यांनी सुद्धा तशाच प्रकारे मतप्रदर्शन केले असते. 

या घडामोडीनंतर मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे तसेच शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी भाजपात प्रवेश देण्यात आला. मंत्रीमंडळातील फेरबदलाचा वाद शमण्याच्या मार्गावर असताना त्यांच्या प्रवेशानंतर वादात आणखीन भर पडली. माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच माजी उद्योग मंत्री महादेव नाईक यांनी डिसोझा प्रमाणे उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांना यथायोगपणे माजी सभापती अनंत शेट, माजी कला व सांस्कृतीक मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या साथ लाभली. या सर्व जेष्ठ नेत्यांचा रोष फक्त प्रदेशाध्यक्षांवर होता. भाजपा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्याकडून एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याचे आरोप या सर्व जेष्ठ  नेत्यांनी करुन पक्ष संघटनेत फेरबदलाची मागणी केली आहे. महादेव नाईक यांनी उघडपणे शिरोडकर यांचा पोटनिवडणुकीत पराभव करण्याचे भाष्य सुद्धा केले आहे. 

दुसऱ्या बाजूने एकेकाळी राज्याचे मंत्री असलेले विद्यमान प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी त्यानंतर झालेल्या २००७ सालच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर २०१२ व २०१७ च्या निवडणुकीपासून ते दूर राहिले होते. दरम्यानच्या काळात त्यांची प्रदेशाध्यक्षपदी व त्यानंतर राज्यसभेवर निवड झाली होती. वरील सर्व नेत्यांच्या तुलनेत तेंडुलकर यांची राज्यसभेपर्यंत लागलेली वर्णी तुलनात्मक सहन होती तर या सर्व नेत्यांनी निवडणुकीत विजया सोबत पराभवाची चटक सुद्धा सहन करुन पक्षासाठी कार्य आजतोवर करीत आलेले आहेत. त्यामुळे विद्यमान परिस्थिती पाहता हे सर्व नेते आपल्या अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लढा देत असल्याचे दिसून आले. 

Web Title: The fight for the existence of BJP leaders in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.