-  सद्गुरु पाटील

पणजी, दि. 11 - गोव्यातील सर्व शहरांमधून जाणारे राज्य महामार्ग (राष्ट्रीय नव्हे) फेरअधिसूचित करून सरकारने ते रस्ते शहरी मार्ग करून टाकले आहेत. यामुळे शहरांमधील रस्त्याच्या बाजूची मद्यालये व दारु दुकाने (वाईन शॉप्स) नव्याने खुली होण्याचा मार्ग कायदेशीरदृष्ट्या मोकळा झाला. ''खा, प्या व मजा करा'' अशा दृष्टीकोनातून गोव्याकडे पाहणा-या व लाखोच्या संख्येने गोव्यात येणा-या पर्यटकांसाठी गोवा सरकारचा नवा उपाय हा सुखावणारा ठरला आहे.
पंधरा लाख लोकसंख्येच्या छोट्या गोव्यात एकूण साडेआठ हजार मद्यालये आहेत. या शिवाय घाऊक व किरकोळ दारू विक्रीची दोन हजार दुकाने आहेत.  पोर्तुगीजांची गोव्यात राजवट होती, त्याकाळी अनेक गोमंतकीयांच्या घरात देखील छोटी मद्यालये सुरू झाली. त्याला तावेर्न असे म्हटले जायचे. आज देखील यापैकी काही तावेर्न तशीच घरांमध्ये सुरू आहेत. शहरांमध्ये बार, तावेर्न, वाईन शॉप्स जास्त संख्येने सापडतात. गोव्यात येणारे पर्यटक गोव्यातील मद्याचा लाभ घेतल्याशिवाय परतत नाही. गोव्यात मद्य स्वस्त मिळते, असाही समज पसरला आहे आणि काही प्रमाणात ते खरेही आहे. गोमंतकीय जास्त मद्य पित नाहीत पण गोव्यात येणारे पर्यटक जास्त पितात,  अशीही उदाहरणे येथील लोक देतात. गोव्यात काजूच्या बोंडूपासून फेणी ही पारंपरिक दारू गाळली जाते. आता तर गोव्याला फेणीचे पेटंटही मिळाले आहे. गोव्याला वार्षिक सरासरी साठ लाख पर्यटक भेट देतात. सुमारे दहा लाख विदेशी व पन्नास लाख देशी पर्यटक गोव्यात वर्षभरात येऊन जातात. येथील हजारो मद्यालये अशा पर्यटकांवरच चालतात. रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. मद्याचा ग्लास हाती घेऊन समुद्रकिनारे पाहत बसलेले लाखो विदेशी व देशी पर्यटक गोव्यात कोणत्याही वेळी सापडतात.
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांपासून दुतर्फा पाचशे मीटर अंतरात एकही मद्यालय किंवा दारू दुकान असू नये, असा आदेश दिल्यानंतर गोव्यातील तीन हजार मद्यालये बंद झाली. यावर उपाय काढण्यासाठी सरकारने ज्या शहरांमधून राज्य महामार्ग (स्टेट हायवे) जात आहेत, त्यांचे रुपांतर शहरी महामार्गांमध्ये नुकतेच करून टाकले आहे. त्यासाठी गेल्याच आठवड्यात गोवा विधानसभेत राज्य महामार्ग कायदा दुरुस्ती विधेयक संमत झाले. यामुळे शहरांमधील रस्ते आता शहरी मार्ग बनले आहेत.
गोवा मद्य विक्रेते संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयामुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायालाही बळकटी मिळेल. पणजीसह कुडचडे, काणकोण, साखळी, डिचोली, वाळपई, कुडचडे, कुंकळ्ळी अशा शहरांमधील पाचशेपेक्षा जास्त मद्यालये आता नव्याने खुली होतील. त्यांच्यावर बंदीची कु-हाड कोसळली होती, असे नाईक म्हणाले.
मद्य व्यवसाय बंद झाला तर गोव्याचे पर्यटनही संपुष्टात येईल. त्यामुळे सरकारने सर्वच मद्यालये नव्याने सुरू व्हावीत म्हणून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याचे ठरविले आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.