पणजी : मी जेव्हा आयआयटीमध्ये शिकत होतो, त्यावेळी तिथे अंमली पदार्थ (ड्रग्ज) उपलब्ध होत असे. काही टार्गट मुले सगळीकडेच असतात. वीस-बावीस मुलांचा असा गट सर्वत्रच असतो. त्यापासून आम्ही दूर राहिलो. तसेच आजच्या विद्यार्थ्यांनीही यापासून दूर रहावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी येथे केले.

सायबर एज योजनेखाली बारावीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करण्याच्या कार्यक्रमावेळी येथील संस्कृती भवनमधील सभागृहात मुख्यमंत्री बोलत होते. सायबर एज योजनेखाली सरकार मुलांना जे संगणक किंवा लॅपटॉप देते, त्याचा गैरवापर ब्ल्यू फिल्म पाहण्यासाठी मुले करतात अशा प्रकारच्या बातम्या प्रारंभी यायच्या. ज्या विद्यार्थ्यांना ब्ल्यू फिल्मसारख्या गोष्टी पहायच्या असतात, त्यांना लॅपटॉपच हवे आहेत असे काहीच असत नाही. आम्ही शिकताना देखील काही टार्गेट मुले असायची. त्यावेळी लॅपटॉप वगैरे आलेच नव्हते. त्या काळातही ब्ल्यू फिल्मसह सगळ्या गोष्टी काही टार्गट मुलांमध्ये चालायच्या. मी आयआयटीत असतानाही तेच चालत होते. त्यासाठी संगणकाची गरज नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सायबर एज योजनेखाली बारावीच्या आणि बारावी उत्तीर्ण होऊन प्रथम वर्षात गेलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत. बुधवारी या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पणजी परिसरातील पाच उच्च माध्यमिक विद्यालयांच्या पन्नास विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. सोशल मिडियाचा गैरवापर होत आहे. काही बुद्धीवादी कोणत्याही प्रकारची व चुकीची माहिती सोशल मिडियामधून पाठवत असतात. सोशल मिडियाला फिल्टर नसतो. विद्यार्थ्यांनी समोर येणारी माहिती फिल्टर करून मगच त्या माहितीचे ग्रहण करण्याची क्षमता स्वत:मध्ये विकसित करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सायबर एज योजनेखाली तुम्ही आम्हाला संगणक दिले होते, त्याचा चांगला वापर करण्यात आम्ही यशस्वी झालो, असे मला काही विद्यार्थ्यांनी यापूर्वी भेटून सांगितले आहे. ही योजना आणल्याचे सार्थक झाले असे मला त्यावेळी वाटले असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विद्यार्थ्यांनी सायबर एज योजनेखाली लॅपटॉप मिळाल्यानंतर त्या लॅपटॉपची खुल्या बाजारात विक्री करू नये. आम्ही त्याविरुद्ध कारवाई करू, असा इशारा यावेळी शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिला. अशा प्रकारे लॅपटॉप खरेदी करणारेही अडचणीत येतील. आम्ही लॅपटॉप जप्त करू, असे भट म्हणाले. 

यावेळी माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हेही व्यासपीठावर होते. त्यांचेही भाषण झाले. आधुनिक काळात प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक तांत्रिक ज्ञान प्राप्त करावे, असे आवाहन मंत्री खंवटे यांनी केले.  गुगल सर्चमधून सगळे काही आरामात मिळत असले तरी, विद्याथ्र्यानी त्यांची वाचनाची सवय बंद करू नये, असेही खंवटे म्हणाले. माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर, माहिती व तंत्रज्ञान सचिव श्री. अभ्यंकर, संचालक श्री. झा हेही यावेळी व्यासपीठावर होते.