कर्नाटकात भाजपा सरकार पडलं, गोव्यात काँग्रेसकडून फटाक्यांची आतषबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 08:04 PM2018-05-19T20:04:11+5:302018-05-19T20:04:11+5:30

येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच व भाजपा सरकार गडगडताच गोव्यातील काँग्रेस हाऊससमोर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र जमले आणि त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली

Congress workers celebrate in Goa after BJP's BS Yeddyurappa stepped down as Chief Minister of Karnataka | कर्नाटकात भाजपा सरकार पडलं, गोव्यात काँग्रेसकडून फटाक्यांची आतषबाजी

कर्नाटकात भाजपा सरकार पडलं, गोव्यात काँग्रेसकडून फटाक्यांची आतषबाजी

Next

पणजी - येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच व भाजपा सरकार गडगडताच गोव्यातील काँग्रेस हाऊससमोर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र जमले आणि त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. काँग्रेसचा विजय असो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

फटाक्यांच्या आतषबाजीवेळी काँग्रेसचे कोणी आमदार उपस्थित राहू शकले नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे मडगावला होते. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. मात्र काँग्रेसमधील महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी हातात ङोंडा घेतला व काँग्रेस हाऊससमोर आनंद साजरा केला. हवेत काँग्रेसचा ध्वज फडकावून काँग्रेसचा विजय असो, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मिठाई वाटूनही आनंद साजरा केला गेला. काँग्रेस हाऊससमोर असलेल्या मुख्य रस्त्यावर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीवेळी काहीवेळा वाहतूक थांबविली गेली.

''लोकशाहीचा विजय''

भारतीय लोकशाहीच्या इतिहासात शनिवारचा दिवस चांगल्या अर्थाने नोंदवला जाईल. लोकशाहीचा शनिवारी मोठा विजय झाला आहे. भाजपने आता तरी शहाणे व्हावे अशा प्रकारची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर व्यक्त केली. राज्यपालांची पदे भाजपाकडून वापरली जात आहेत याचे वाईट वाटते. गोव्यात काँग्रेस हा जेव्हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता तेव्हा काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी बोलावले गेले नाही. कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा याना तेथील राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसले. ते केवळ दोनच दिवस त्या खुर्चीवर राहू शकले. त्यांच्याकडे बहुमत नव्हते. राज्यपालांचा निर्णय किती चुकीचा होता ते कळून आले, असे कवळेकर म्हणाले. भाजपाला कर्नाटकमध्ये घोडेबाजार भरवायचा होता पण न्यायसंस्थेने त्यांना पहिली चपराक दिली, असे कवळेकर म्हणाले.

गोवा, मणिपूर, मेघालया आणि बिहारमधील काँग्रेस कार्यकर्त्यांवर जो अन्याय केला गेला होता व त्यांना जी वेदना दिली गेली होती, त्याचे स्मरण आता भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांना होईल,अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली आहे. जनतेकडून जो कौल दिला जातो, त्याचा स्वीकार न करता भाजप नेमका विरुद्ध वागतो. भाजपाच्या या वृत्तीला कर्नाटकमध्ये जबरदस्त तडाखा बसला आहे, असे चोडणकर म्हणाले.

Web Title: Congress workers celebrate in Goa after BJP's BS Yeddyurappa stepped down as Chief Minister of Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.