गोव्यात काँग्रेसकडून सरकार स्थापन करण्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 06:17 PM2019-03-16T18:17:17+5:302019-03-16T19:13:04+5:30

गोव्यातील काँग्रेस पक्षाकडून राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात आला आहे.

Congress stakes claim to form government in Goa | गोव्यात काँग्रेसकडून सरकार स्थापन करण्याचा दावा

गोव्यात काँग्रेसकडून सरकार स्थापन करण्याचा दावा

Next

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची स्थिती अत्यंत नाजूक बनलेली आहे. मनोहर पर्रीकर यांचा रक्तदाबही वारंवार कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या सर्व आमदारांना गोव्यातच राहण्याची सूचना केली आहे. दुस-याबाजूने विरोधी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. सरकारमधील सहा बिगरभाजपा मंत्री व आमदार संघटीत झाले असून पुढील मुख्यमंत्री ठरवताना आपल्याला विश्वासात घ्यायला हवे म्हणून या गटाने रणनीती तयार केली आहे.
मनोहर पर्रीकर यांच्याविषयी दिवसभर खूप अफवा पसरल्या. सकाळी मनोहर पर्रीकर यांची स्थिती खूप बिघडली होती. त्यांचा रक्तदाब एकदम खाली आल्यानंतर गोमेकॉ इस्पितळाच्या काही डॉक्टरांनी त्यांच्या घरी धाव घेतली. तसेच भाजपचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर हेही मनोहर पर्रीकर यांच्या दोनापावल येथील खासगी निवासस्थानी जाऊन आले. मनोहर पर्रीकर यांची स्थिती स्थिर आहे, असा दावा कुंकळ्ळ्य़ेकर यांनी सकाळी केला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेही मनोहर पर्रीकर यांची स्थिती स्थिर असल्याचे सांगितले. मात्र. मनोहर पर्रीकर यांची स्थिती बिघडत चालल्याची कल्पना भाजपाच्या कोअर टीमला आली. सायंकाळी पक्षाचे संघटन मंत्री  सतिश धोंड यांनी राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली.


भाजपाकडे तेरा आमदार आहेत. भाजपाने आपल्या अकरा आमदारांची एकत्र बैठक घेतली. एक मंत्री  विदेशात आहे. कुणीच भाजपा आमदाराने या दोन-तीन दिवसांत गोव्याबाहेर जाऊ नये अशी सूचना सर्व आमदारांना करण्यात आली आहे. मनोहर पर्रीकर सरकारमधील मंत्री विजय सरदेसाई, रोहन खंवटे, विनोद पालयेकर, गोविंद गावडे, जयेश साळगावकर व आमदार प्रसाद गावकर हे सहाजण एकत्र आले. त्यांनी मनोहर पर्रीकर यांची स्थिती जाणून घेण्यासाठी मनोहर पर्रीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. मनोहर पर्रीकर वेन्टीलेटरवर आहेत.
विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपालांना पत्र पाठवून दिले आहे. काँग्रेसकडे बहुमत असून विधानसभा विसर्जित केली जाऊ नये अशी काँग्रेसची भूमिका आहे. राष्ट्रपती राजवट लागू न करता आम्हाला सरकार स्थापनेची संधी दिली जावी, अशी मागणी कवळेकर यांनी केली आहे. काँग्रेसने राज्यपालांकडे प्रत्यक्ष भेटीसाठीही वेळ मागितली आहे.


 

Web Title: Congress stakes claim to form government in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.