गोवा सरकार अस्थिर करत असल्याचा भाजपचा आरोप काँग्रेसनं फेटाळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:32 AM2018-04-20T11:32:27+5:302018-04-20T11:34:25+5:30

भाजपच्या आमदारांमध्येच धुसफूस असल्याचा काँग्रेसचा दावा

Congress denies allegation of BJP that it is destabilizing Parrikar government | गोवा सरकार अस्थिर करत असल्याचा भाजपचा आरोप काँग्रेसनं फेटाळला 

गोवा सरकार अस्थिर करत असल्याचा भाजपचा आरोप काँग्रेसनं फेटाळला 

पणजी : राज्य सरकार अस्थिर केलं जात असल्याचा सत्ताधारी भाजपचा आरोप काँग्रेस पक्षानं फेटाळून लावला आहे. सत्ताधारी भाजपमध्येच धुसफूस असल्यानं त्यांना सरकार अस्थिर झाल्यासारखं वाटतं, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

काँग्रेसच्या आमदारांनी नुकतीच राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केलं होतं. सरकार चालत नसल्यानं गोव्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यपालांनी या विषयात हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली होती. त्यावर भाजपने टीका केली. राज्यात पीडीएविरोधी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेस पक्ष चिथावणी देत आहे, अशीही टीका भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे आणि इतरांनी केली होती. 

गोव्यातील भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील एक मंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी तर पीडीएविरोधी आंदोलनातून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावा करून यासाठी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. विरोधी पक्षच पीडीएविरोधी आंदोलनाच्या मागे आहे, असे सरदेसाई म्हणाले होते. भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक गुरुवारी पणजीत पार पडली. त्या बैठकीत एक राजकीय ठराव मांडून संमत केला गेला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारांसाठी अमेरिकेत आहेत. अशावेळी गोव्यात विरोधक सरकार अस्थिर करू पाहत आहेत आणि त्यांचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दांत भाजपने काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. 

काँग्रेसनं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नसल्याचं विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी 'लोकमत'शी सांगताना म्हटलं. 'पर्रीकर यांच्या आजारपणामुळे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी जेव्हा कमी करून तीन दिवसांवर आणला गेला, तेव्हाही काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांना सहकार्य केलं. भाजपच्या आमदारांमध्येच धुसफूस आहे आणि त्यामुळे त्यांना सरकार अस्थिर झाल्यासारखं वाटतं असावं,' असं कवळेकर यांनी म्हटलं.
 

Web Title: Congress denies allegation of BJP that it is destabilizing Parrikar government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.