Chief Minister Manohar Parrikar listened to grievances of party workers; BJP leaders, office bearers present | मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी ऐकली कार्यकर्त्यांची गा-हाणी; भाजपा नेते, पदाधिकारी उपस्थित

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गुरुवारी भाजपाच्या पणजीतील मुख्य कार्यालयात तीन ते चार तास उपस्थित राहिले व त्यांनी राज्यातील सात- आठ मतदारसंघांतील भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे, त्यांच्या मागण्या व अपेक्षा जाणून घेतल्या.
भाजपाने आपल्या प्रत्येक मंत्र्याला पंधरा दिवसांनी एकदा भाजपाच्या पणजीतील कार्यालयात बसून कार्यकर्त्यांना भेटण्याची सूचना केली आहे. लोकांच्या गर्दीमध्ये मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणे भाजपाच्या कार्यकर्त्यांना अनेकवेळा शक्य होत नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यालयात महिन्यातून दोनवेळा तरी मंत्री बसावेत अशी कल्पना पुढे आली. यापूर्वी आरोग्य मंत्री विश्वजित राणे, वीज मंत्री पांडुरंग मडकईकर, केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक वगैरे भाजपच्या कार्यालयात बसले व त्यांनी कार्यकत्र्याचे मन जाणून घेतले. काही कार्यकर्त्यांना त्यावेळी नोकरीची अपेक्षा व्यक्त केली तर काही कार्यकर्ते तसेच भाजपच्या नगरसेवकांनी आपआपल्या भागातील सार्वजनिक समस्या सुटण्याच्यादृष्टीने आपली मते मांडली होती. भाजपाच्या नगरसेवकांनीही अनेक समस्या मांडल्या होत्या. लोकांना व भाजपा कार्यकर्त्यांना समस्या जलदगतीने सुटलेल्या हव्या आहेत. प्रशासकीय पातळीवरील अडचणी लवकर दूर व्हाव्यात ही सर्वाचीच अपेक्षा आहे.
बुधवारी मुख्यमंत्री पर्रीकर दुस-यांदा भाजपाच्या कार्यालयात कार्यकर्त्यासाठी उपस्थित राहिले. पहिल्यांदा ते दि. 8 डिसेंबरला उपस्थित राहिले होते. सात-आठ मतदारसंघांतील दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. काही कार्यकर्त्यांनी स्वत:चे व्यक्तिगत, कौटुंबिक प्रश्न सांगितले तर अनेकांनी विकास कामांविषयीच्या मागण्या मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी विविध प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भाजपा कार्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मध्यंतरी आपल्या कन्येच्या विवाह सोहळ्य़ात गुदिन्हो व्यस्त राहिले, त्यामुळे ते पक्ष कार्यालयात येऊ शकले नाहीत, असे भाजपच्या पदाधिका-यांनी सांगितले. फ्रान्सिस डिसोझा हे ज्येष्ठ मंत्री आजारी होते. तरी ते यापुढील काळात पक्ष कार्यालयात येतील.
दरम्यान, भाजपाने राज्यभर बूथ विस्ताराची योजना अंमलात आणली. त्याचा समारोप येत्या 30 रोजी होणार आहे. सायंकाळी चार वाजता मळा येथील कम्युनिटी सभागृहात भाजपाचा सोहळा होईल व त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह अनेक भाजपा नेते, पदाधिकारी व बूथ विस्तारक उपस्थित राहतील.