बंगला २00 कोटींचा नव्हे, ७ कोटींचा!; लोकायुक्तांना मडकईकर यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 07:56 PM2018-10-23T19:56:30+5:302018-10-23T19:57:15+5:30

जुने गोवे येथे बांधलेला ‘तो’ बंगला आपला स्वत:चा नसून मेसर्स निकिताशा रीयाल्टर्स प्रा. लि. कंपनीचा आहे. या कंपनीचा आपण व्यवस्थापकीय संचालक आहे आणि कंपनीने हा बंगला आपल्याला वापरायला दिला आहे.

Bungalow not worth 200 crores, 7 crores!; Information of Madakaikar to the Lokayukta | बंगला २00 कोटींचा नव्हे, ७ कोटींचा!; लोकायुक्तांना मडकईकर यांची माहिती 

बंगला २00 कोटींचा नव्हे, ७ कोटींचा!; लोकायुक्तांना मडकईकर यांची माहिती 

Next

पणजी : जुने गोवे येथे बांधलेला ‘तो’ बंगला आपला स्वत:चा नसून मेसर्स निकिताशा रीयाल्टर्स प्रा. लि, कंपनीचा आहे. या कंपनीचा आपण व्यवस्थापकीय संचालक आहे आणि कंपनीने हा बंगला आपल्याला वापरायला दिला आहे. शिवाय या बंगल्याची किंमत २00 कोटी रुपये नसून सुमारे ७ कोटी रुपये आहे, असे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी लोकायुक्तांना उत्तरादाखल सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

मुंबई येथे खाजगी इस्पितळात उपचार घेत असलेले मडकईकर यांनी नोटरीसमोर सह्या करुन हे प्रतिज्ञापत्र लोकायुक्तांना पाठवले आहे. मडकईकर यांच्याविरुध्द बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात गुन्हे का नोंदविले नाहीत हे मुख्य सचिव तसेच लांच लुचपतविरोधी विभागाने स्पष्ट करावे, असे निर्देश लोकायुक्तांनी दिले असून या प्रकरणी सुनावणी २१ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. 

मडकईकर प्रतिज्ञापत्रात असे म्हणतात की, ‘ ३५,0७५ चौरस मिटरचा भूखंड मेसर्स निकिताशा रीयाल्टर्स कंपनीने ४७ लाख ४६ हजार २६0 रुपयांना खरेदी केला. ३१ मार्च २0१८ पर्यंत या बंगल्याच्या बांधकामावर ५ कोटी ७१ लाख ३७ हजार १५६ रुपये खर्च केले तर त्यानंतर १ एप्रिल ते गेल्या ११ आॅक्टोबर या कालावधीत १ कोटी ११ लाख ४५ हजार ९४४ रुपये अतिरिक्त खर्च झाला. बंगला तसेच स्विमिंग पूल व कुंपणाचे आदी सर्व बांधकामाचा खर्च कंपनीने केला आहे. त्यामुळे हा बंगला ही आपली वैयक्तिक मालमत्ता ठरत नाही किंवा आपल्या उत्पन्नातही ती गृहित धरता येणार नाही, असे मडकईकर यांचे म्हणणे आहे. 

मडकईकर यांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेबाबत समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी लोकायुक्तांकडे सादर केली होती. जुने गोवें येथे बॉ जिझस बासिलिका चर्चजवळ सुमारे २00 कोटी रुपये खर्चुन आलिशान बंगला बांधल्याचा आयरिश यांचा दावा आहे. मडकईकर व त्यांची पत्नी जेनिता यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात त्यानी दक्षता खात्याकडेही केली होती. जेनिता या जुने गोवे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. या उभयतांविरुध्द १९८८ च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (ड) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२0 (ब) खाली गुन्हे नोंद करून लाचलुचपत विभागाला या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे.        

२0१५-१६ च्या आयकर विवरणपत्रात मडकईकर यांनी  स्वत:चे वार्षिक उत्पन्न १,४४,३८९ रुपये एवढे अल्प उत्पन्न दाखवले आहे. असे  असताना २00 कोटींचा आलिशान बंगला बांधला कसा, असा प्रश्न आयरिश यांनी उपस्थित केला आहे. जुने गोवेतील सर्वे क्रमांक १४३/१ या जागेत हा आलिशान बंगला बांधण्यात आला आहे. मडकईकर हे सध्या आजारी असून मुंबईतील एका खाजगी इस्पितळात गेले काही दिवस वैद्यकीय उपचार घेत आहेत. 

Web Title: Bungalow not worth 200 crores, 7 crores!; Information of Madakaikar to the Lokayukta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा