ओहोळात बुडालेला 'तो' मुलगा अद्याप बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 03:13 PM2019-07-16T15:13:28+5:302019-07-16T15:15:32+5:30

नौदलाच्या डायव्हर्सकडून शोध; अग्नीशमन दलाच्या जवानांचीही रात्रभर गस्त

boy drowned in brooklet still missing | ओहोळात बुडालेला 'तो' मुलगा अद्याप बेपत्ता

ओहोळात बुडालेला 'तो' मुलगा अद्याप बेपत्ता

Next

मडगाव: मडगावपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरी-नावेली येथे सोमवारी सायंकाळी पावसाने भरलेल्या ओहोळात बुडालेल्या दीपक खत्री या 11 वर्षीय मुलाचा अद्यापही पत्ता लागलेला नसून या घटनेला 24 तास उलटायला आले असून शोधकार्यात गुंतलेल्यांना अद्याप तो सापडलेला नाही. सध्या या शोधकामात नौदलाच्या डायव्हर्सची (पाणबुड्यांची) मदत घेण्यात आली असून सकाळपासून सहा डायव्हर्स पाण्यात खोल जाऊन त्याचा शोध घेत होते.

ही दुर्घटना सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली होती. याच ओहोळाच्या काठावर राहणारा दीपक व त्याचे अन्य मित्र ओहोळाच्या काठी सायकल चालवत असताना तोल जाऊन तो पाण्यात पडला होता. रविवारी रात्री पडलेल्या संततधार पावसामुळे हा ओहोळ भरुन वाहत होता. या घटनेची माहिती अग्नीशमन दलाला देण्यात आल्यानंतर त्यांनी त्वरित त्याचा शोध घेतला. त्याची सायकल पाण्यात सापडली. मात्र तो सापडला नाही. 

मंगळवारी सकाळी नौदलाच्या जवानांना शोधकार्यात सामील करुन घेण्यात आले. नौदलाच्या जवानांनी आपल्या बोटीने त्याचा शोध घेण्याबरोबरच डायव्हर्सचाही वापर करुन पाहिला. सायंकाळी उशिरा सांगेतील खासगी डायव्हर फ्रान्सिस्को हाही शोधकार्यात सामील झाला होता. तरीही बुडालेल्या दीपकचा काही पत्ता लागू शकला नाही.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी स्थानिक आमदार लुईडान फालेरो यांनी घटनास्थळावर धाव घेत अग्नीशमन दलाच्या जवानांबरोबर स्वत:ही त्यांच्या बोटवर चढून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळीही ते घटनास्थळी हजर होते अशी माहिती मडगावचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी दिली.
 

Web Title: boy drowned in brooklet still missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.