गोव्यात भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका ठरणार पक्षाला मारक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 05:27 PM2018-10-18T17:27:07+5:302018-10-18T17:27:39+5:30

काँग्रेसच्या दोन आमदारांना पक्षात दिलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर  ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली टोकाची भूमिका उत्तर गोव्यात पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी एकंदरीत मारक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

The BJP's senior leaders in Goa will be the face of the BJP | गोव्यात भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका ठरणार पक्षाला मारक

गोव्यात भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका ठरणार पक्षाला मारक

Next

म्हापसा - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जागी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची प्रक्रिया जोर धरू लागली असली तर काही दिवसापूर्वी राज्य मंत्रीमंडळात केलेल्या फेरबदलानंतर उत्तर गोव्यातील अल्पसंख्याक आमदारांनी पक्षावर केलेली टीका व त्यानंतर काँग्रेसच्या दोन आमदारांना पक्षात दिलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर  ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली टोकाची भूमिका उत्तर गोव्यात पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी एकंदरीत मारक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

पक्षाच्या ध्येय धोरणांवर नेत्यांकडून वारंवार होत असलेल्या टीकेतून कार्यकर्ता मात्र सध्या अस्वस्थ झाला असून, त्याचे विपरीत परिणाम होणाऱ्या लोकसभा तसेच विधासभेच्या पोटनिवडणुकीवर होण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. यावर मात करुन पुढील वाटचाल करण्याची परिस्थिती पक्षावर येवून ठेपली आहे.  

गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांची तुलना केल्यास उत्तर गोव्यातील मतदार संघावर भाजपचे प्रभुत्व जास्त प्रमाणावर आहे. विद्यमान केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सतत चारवेळा लोकसभेवर निवडून येणे हे त्याचे प्रामुख्याने उदाहरण आहे. भाजपने राज्यातील सत्ता ज्यावेली काबीज केली त्याची मुहूर्तमेढ उत्तरेतून रोवली आाहे. अशा या जिल्ह्यातून पक्षाने घेतलेल्या निर्णयाला होत असलेला विरोध प्रचंडपणे वाढू लागला आहे. त्याची सुरुवात मंत्रिमंडळात करण्यात आलेल्या फेरबदलातून झाली. 

म्हापसा मतदार संघाचे आमदार पक्षाचे जेष्ठ नेते अ‍ॅड. फ्रन्सिस डिसोझा यांना मंत्रीमंडळातून डच्चू दिल्यानंतर त्याची खऱ्या अर्थाने सुरवात झाली. बार्देश तालुक्यातील पक्षाच्या इतर दोन अल्पसंख्यांक आमदारांनी डिसोझा यांचे समर्थन करुन पक्षावर उघडपणे टीका करुन आव्हान उभे केले. सुरू झालेला हा वाद शमण्याच्या वाटेवर असताना दोन काँग्रेस आमदारांना पक्षात प्रवेश देवून दुसऱ्या वादाला तोंड फुटले. 

दुसऱ्या वादाची सुरवात माजी मुख्यमंत्री दोन वेळचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडून झाली. त्याला नंतर माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर व आता आमदार अ‍ॅड. फ्रन्सिस डिसोझा यांनी मुठमाती दिली. या चारही ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली भूमिका तसेच उघडपणे व्यक्त केलेली नाराजी पक्षाला मारक ठरणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. या  ज्येष्ठ नेत्यांची पक्षावर टीका करण्याची कारणे विविध असली तरी स्वत:ला वाटत असलेली असुरक्षितता त्या मागचे प्रमुख कारण मानले जात आहे. पक्षातील त्यांचे कमी झालेले महत्त्व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा परिणामकार ठरण्याची शक्यता त्यांना वाटू लागली आहे. 

पक्षात प्रवेश केलेले काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे यांनी मागील विधानसभेच्या निवडणुकीत पार्सेकरांचा पराभव केला होता. त्यामुळे सोपटेंच्या प्रवेशानंतर त्यांना आपली वाटचाल असुरक्षित वाटू लागली आहे. आर्लेकरांवर कार्यकर्त्यांच्या वाढलेल्या नाराजीमुळे त्यांना पुन्हा त्यांच्या पेडणे मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यावर प्रश्न निर्माण झाले आहेत. डिसोझा हे सततच्या आजारपणामुळे पुन्हा निवडणुका लढवण्याची शक्यता कमी आहे तर मांद्रेकरांच्या जागी पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी मारक ठरण्याची शक्यता दिसू लागली आहे. 

Web Title: The BJP's senior leaders in Goa will be the face of the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.