जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे भानही भाजपला नाही-यशवंत सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 02:04 PM2018-05-11T14:04:37+5:302018-05-11T14:04:37+5:30

केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष चालला आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा आगपाखड केली आहे.

BJP is not aware of the fulfillment of promises made in the manifesto - Yashwant Sinha | जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे भानही भाजपला नाही-यशवंत सिन्हा

जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे भानही भाजपला नाही-यशवंत सिन्हा

googlenewsNext

पणजी : गेल्या लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे भानही भाजपा नेत्यांना राहिलेले नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष चालला आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा आगपाखड केली आहे.  दोन दिवसांच्या गोवा दौ-यावर आले असता दोनापॉल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये काही निवडक निमंत्रितांनी त्यांच्याशी संवाद साधला. सिन्हा एका प्रश्नावर म्हणाले की, ‘माझ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हा मुद्दा नाही. तर त्यांचे विचार आणि ध्येयधोरणांना माझा विरोध आहे. देशात जे काही चालले आहे ते पाहता लोकशाहीच्या संवर्धनासाठी पर्यायी अजेंड्याची गरज आहे. आज जिकडे तिकडे मोदी यांचाच जयघोष चालला आहे. भाजपाने गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी लोकांना जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली आहे किंवा नाही हे पाहण्याचे कोणालाही भान नाही.’

‘पुत्राला भाजपाने तिकीट दिली तरी काम करणार नाही’

आगामी लोकसभा निवडणुकीत हजारीबाग मतदारसंघात भाजपाने पुत्र जयंत सिन्हा यांना तिकीट दिली तरी त्याच्यासाठी काम करणार नाही, असे स्पष्ट उत्तर सिन्हा यांनी एका प्रश्नावर दिले. जयंत सिन्हा हे केंद्रात हवाई वाहतूक राज्यमंत्री आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या बंडखोर पित्याचे मत जाणून घेण्यात आले. आगामी निवडणुकीत हजारीबाग मतदारसंघात तुमच्या पुत्राला भाजपाने तिकीट दिली तर त्याच्यासाठी काम करणार काय, या खोचक प्रश्नावर सिन्हा यांनी तात्काळ ‘मुळीच नाही’, असे उत्तर दिले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सत्ताधारी सरकारकडून गोलमाल केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करुन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतपत्रिकांचाच वापर व्हावा यासाठी चळवळ उभारा, असे आवाहन सिन्हा यांनी केले. निवडणूक आयोग स्वत:च किती इव्हीएम आहेत आणि त्यांची निर्मिती कुठे होते याबाबत अंधारात असून कोणताही हिशोब आयोगाकडे नसल्याचा ठाम दावाही सिन्हा यांनी  केला. 

जीना यांची तसबीर का काढावी? 

अलिगड मुस्लिम विद्यापीठात असलेली मोहम्मद अली जीना यांची तसबीर काढून टाकण्याची मागणी करणा-यांवर सिन्हा यांनी तोफा डागल्या. ते म्हणाले की, इतकी वर्षे ही तसबीर या ठिकाणी आहे ती का म्हणून काढावी. या देशात खरे तर अल्पसंख्यांकांनी असुरक्षिततेची भीती व्यक्त केली तर तर एकवेळ समजता येण्यासारखे आहे. परंतु बहुसंख्य असलेला समाज अशा मागण्या करुन लागला आहे ही धोकादायक बाब आहे. १५ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत हिंदूना कोणी संरक्षण दिले? गोव्यात पोर्तुगीजांनी मंदिरांच्याबाबतीत आगळीक केली तेव्हा कोण उभे राहिले? असे सवाल त्यांनी के ले. असहिष्णूतेच्या बाबतीत त्यानी कडक ताशेरे ओढले. 

खोचक प्रश्नाला असे उत्तर!

दरम्यान, बुद्धीभेदासाठी तुम्हाला भाजपानेच कशावरुन पेरले नसावे या अत्यंत खोचक प्रश्नावर सिन्हा म्हणाले की, ‘विश्वास दाखवा आणि नंतर तपासून घ्या किंवा आधी तपासून घ्या आणि नंतरच विश्वास दाखवा’, अशा दोन गोष्टी करता येतील. पण एक लक्षात ठेवा की, आजही लोकांचा आदर्श महात्मा गांधी हेच आहेत. हिटलर नव्हे!’ त्यांचा हा अप्रत्यक्ष टोला मोदी यांच्यासाठीच होता. लोकशक्तीवर विश्वास ठेवा, आज आमची संख्या भली कमी असेल परंतु एक दिवस ती निश्चितच वाढेल.’

'चळवळ उभारा, आम्ही पाठीशी राहू’

गोव्यात विकासाच्या नियोजनाच्या बाबतीत जे भयंकर गैरव्यवहार चालले आहेत ते पाहता एक दिवस गोमतंकीयांना हातात बंदुका घेऊनच रस्त्यावर उतरावे लागेल, असे मत एका उपस्थिताने व्यक्त केले असता हिंसाचाराने प्रश्न सुटत नाहीत. ‘तुम्ही चळवळ उभारा आम्ही तुमच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

‘आप’चे नेते एल्विस गोम्स, ‘सिटीझन फॉर डेमोक्रेसी’ संघटनेचे निमंत्रक मनोज कामत यावेळी व्यासपीठावर होते. उपस्थितांमध्ये आमदार नीळकंठ हळर्णकर, भाभासुमंचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर, अरविंद भाटीकर, माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांचा समावेश होता. 

Web Title: BJP is not aware of the fulfillment of promises made in the manifesto - Yashwant Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.