पर्रीकरांचं पार्थिव ठेवल्यानं कला अकादमीचं 'शुद्धीकरण'?; राज्यभरातून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 07:38 AM2019-03-24T07:38:55+5:302019-03-24T07:40:16+5:30

जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

After manohar Parrikars death Goa government orders probe into purification ritual at venue | पर्रीकरांचं पार्थिव ठेवल्यानं कला अकादमीचं 'शुद्धीकरण'?; राज्यभरातून निषेध

पर्रीकरांचं पार्थिव ठेवल्यानं कला अकादमीचं 'शुद्धीकरण'?; राज्यभरातून निषेध

Next

पणजी: माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या कला अकादमीचं शुद्धीकरण करण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या कृतीचा राज्यभरातून निषेध करण्यात आला आहे. ही कृती म्हणजे पर्रीकर यांच्या स्मृतीचा उपमर्द तर आहेच, इतकेच नव्हे तर राज्य सरकारचं कला आणि संस्कृती खातं धार्मिक विकृतीच्या आहारी जात असल्याच्या प्रतिक्रिया राज्यभरात उमटू लागल्या आहेत.

मनोहर पर्रीकर यांचं 17 मार्चला निधन झालं. त्यांच्यावर 18 मार्चला शासकीय इमतामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पणजीतील कला अकादमीत ठेवण्यात आलं होतं. या अकादमीचं शुद्धीकरण करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. काही ब्राह्मणांनी गोमूत्र शिंपडल्यानंतर संकुल 'पवित्र' झाल्याचं जाहीर केलं. यावेळी कला अकादमीचे सदस्य सचिव गुरुदास पिळर्णकर ब्राह्मणांसोबत होते. त्यांना याबद्दल विचारलं असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र त्यांच्यासोबत असलेल्या कामत नामक कर्मचाऱ्यानं या प्रकाराचे आयोजन 'आम्ही' केलं आहे, असं उत्तर दिलं. 'आम्ही' म्हणजे कला अकादमीनं की कुणा व्यक्तीनं, असा प्रतिप्रश्न केला असता त्यांनी उत्तर न देता तेथून जाणं पसंत केलं. 

या संदर्भात कला अकादमीचे अध्यक्ष आणि कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितलं की, कला अकदमीत होम करण्यासाठी आपल्याकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र नेमकं काय झालं याची कल्पना मला नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती गावडे यांनी दिली. या प्रकारावरुन राज्यभरातून प्रशासनावर टीका होत आहे. हाच न्याय लावायचा असेल, तर पुण्यातील साहित्य परिषद, टिळक स्मारक, एस. एम. जोशी सभागृह यांचं रोजच शुद्धीकरण करावं लागेल, अशी टिप्पणी पत्रकार चिंतामण पत्की यांनी केली. कला अकादमीचा प्रतिगामी आणि सनातनी चेहरा या प्रकारातून पुढे आला असून त्याला जबाबदार असलेल्यांवर त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

Web Title: After manohar Parrikars death Goa government orders probe into purification ritual at venue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.