गोव्यात पोटनिवडणुकीतून ‘आप’ची माघार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 06:42 PM2017-08-03T18:42:32+5:302017-08-03T18:50:11+5:30

गोव्याची राजधानी पणजी तसेच वाळपई विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने गुरुवारी जाहीर केला. या दोन्ही पोटनिवडणुका लढविणार असल्याचे पक्षाने यापूर्वी म्हटलेले होते.

AAP's retreat from Goa by-elections | गोव्यात पोटनिवडणुकीतून ‘आप’ची माघार 

गोव्यात पोटनिवडणुकीतून ‘आप’ची माघार 

Next

पणजी, दि. 3 - गोव्याची राजधानी पणजी तसेच वाळपई विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने गुरुवारी जाहीर केला. या दोन्ही पोटनिवडणुका लढविणार असल्याचे पक्षाने यापूर्वी म्हटलेले होते.
संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देऊन मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री होणे पसंत केले. त्यांच्यासाठी पणजीच्या आमदारकीचा सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी राजीनामा दिला. त्यामुळे पोटनिवडणूक होत आहे. माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंग राणे यांचे पुत्र विश्वजीत राणे यांनी काँग्रेसला रामराम करून भाजप सरकारमध्ये आरोग्यमंत्रिपद स्वीकारले. त्यामुळे वाळपई विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.
आपने या दोन्ही मतदारसंघांतून माघार घेतल्याने आता तिरंगी लढती होईल, हे जवळपास निश्चित आहे. आम आदमी पक्षाने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या होत्या; पण त्यांचा एकही उमेदवार टिकाव धरू शकला नव्हता. निवडणुकीनंतर पक्षाचे काम थंडावले आहे. पर्रिकर यांच्या विरोधातील मते विभागली जाऊ नयेत, मतदारांचा गोंधळ उडू नये तसेच पर्रिकर यांची कोंडी व्हावी, असे आपने म्हटले आहे. जाहीर बोलण्याची ही भाषा असली तरी संघटनात्मक ताकद कमी असल्याने आपने निवडणुका लढविल्या असत्या तरी चित्र फारसे बदलले नसते, असे राजकीय जाणकारांना वाटते. 
पणजी मतदारसंघातून भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे राष्ट्रीय सरचिटणीस गिरीश चोडणकर लढत देतील. भाषा माध्यमाच्या मुद्द्यावरून भाजपशी पंगा घेतलेल्या गोवा सुरक्षा मंच पक्षाने पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनाच निवडणूक रिंगणात उतरविले आहे. पर्रिकर यांना बिनविरोध निवडून येण्याची संधी न देणे आणि निवडणुकीच्या माध्यमातून पर्रिकर यांच्यावर भाषा माध्यमाचा प्रश्न सोडविण्यासाठी दबाव टाकण्याची खेळी गोवा सुरक्षा मंच खेळण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना त्यांना साथ देण्याची शक्यता आहे.

 

Web Title: AAP's retreat from Goa by-elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.