२०० शाळा शिक्षकांविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:53 PM2018-06-28T23:53:47+5:302018-06-28T23:54:49+5:30

आॅनलाईन बदल्यांदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास २०० शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नाही. या शाळा शिक्षकांविना पोरक्या पडल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

Without 200 school teachers | २०० शाळा शिक्षकांविनाच

२०० शाळा शिक्षकांविनाच

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे नुकसान : आॅनलाईन बदलीचा परिणाम, दुर्गम भागातील शाळांमध्ये पदे रिक्त

दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आॅनलाईन बदल्यांदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास २०० शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नाही. या शाळा शिक्षकांविना पोरक्या पडल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांमधील बहुतांश गावे अतिशय दुर्गम आहेत. काही गावांमध्ये जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही. पावसाळ्यात या गावांचा जगाशी संपर्क तुटतो. अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेल्या या गावांमध्ये जाणारी पायवाट सुध्दा अतिशय बिकट आहे. जिल्हा मुख्यालयापासून या तालुक्यांमधील गावांचे अंतर १५० किमीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या गावांमध्ये सेवा देण्यास इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शिक्षक तयार होत नाही.
आॅनलाईन बदली दरम्यान २० शाळांचे पसंतीक्रम शिक्षकांना द्यायचे होते. मात्र बहुतांश शिक्षकांनी सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांमधील शाळांची निवडच केली नाही. त्यामुळे या शाळांना शिक्षकच मिळाले नाही. शिक्षक बदलीनंतर ४०० शिक्षक विस्थापित झाले होते. मात्र याही शिक्षकांनी अतिशय दुर्गम भागातील शाळांची निवड केली नाही. परिणामी या शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही २०० शाळांना शिक्षकच उपलब्ध झाले नाही. ज्या शाळांमध्ये शिक्षक नाही, अशा शाळांमध्ये दोन शिक्षकी शाळांमधील एका शिक्षकाला प्रतिनियुक्ती दिली जात आहे. शिक्षक नसलेल्या शाळा दुर्गम भागातील असल्याने या शाळांमध्ये शिक्षक जाण्यास तयार नाही. मात्र कारवाईचा बडगा दाखवून त्यांना संबंधित शाळेवर नेमले जात आहे. यामुळे दोन शिक्षकी शाळेत आता एकच शिक्षक राहणार आहे. एक शिक्षक चार वर्ग सांभाळणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे सुध्दा शैक्षणिक नुकसान होणार आहे. बंद शाळांवर काही शिक्षकांची नियुक्ती झाली आहे, त्यांना विद्यार्थी असलेल्या शाळेत नियुक्ती द्यावी अशी मागणी आहे.
भामरागडातील २५ शाळा पोरक्या
भामरागड हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक दुर्गम व आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ९२ शाळा आहेत. या तालुक्यातील शाळांची शिक्षकांनी निवडच केली नाही. परिणामी बदली आटोपल्यानंतर या तालुक्यातील २५ शाळा शिक्षकाविना राहिल्या आहेत. तर ३७ शाळांमध्ये एकच शिक्षक आहे. २५ शाळांमध्ये प्रत्येकी एक शिक्षक देऊनही काही शाळांना शिक्षकच मिळणार नाही. परिणामी दुसऱ्या तालुक्यातील शिक्षकांना या शाळेत प्रतिनियुक्ती द्यावी लागणार आहे. मात्र सदर शिक्षक रूजू होण्यास सहजासहजी तयार होणार नाही. त्यासाठी त्यांना कारवाईचा धाक दाखवावा लागणार आहे.
ज्या शाळांमध्ये दोन शिक्षक आहेत. अशा शाळांमधील एका शिक्षकाला एकही शिक्षक नसलेल्या शाळेत तात्पुरती नियुक्ती देण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार शिक्षकांचे समायोजन सुरू आहे. एकही शाळा शिक्षकाविना बंद राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल.
- पी. एच. उरकुडे,
प्राथमिक शिक्षणाधिकारी
पेसा कायद्याचे उल्लंघन
जी गावे पेसा अंतर्गत मोडतात, ती गावे आदिवासी बहुल आहेत. जिल्हा परिषद स्तरावर बदली करताना या गावांना प्रथम प्राधान्य देऊन तेथील शिक्षकांच्या जागा भरल्या जात होत्या. त्यानंतर उर्वरित शाळांना प्राधान्य दिले जात होते. मात्र आॅनलाईन बदली दरम्यान पेसा कायद्याचे उल्लंघन झाले आहे. शिक्षक नसलेल्या २०० शाळांपैकी बहुतांश शाळा पेसा अंतर्गत मोडणाऱ्या आहेत.
आंतर जिल्हा बदलीमुळे गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास ३०० शिक्षक बदलून गेले. त्यांच्या ऐवजी केवळ २० ते ३० शिक्षक जिल्ह्यात आले. परिणामी रिक्त जागांची संख्या वाढली आहे.
आॅनलाईन बदलीची प्रक्रिया आता पुढच्यावर्षी शिवाय राबविणे शक्य नाही. त्यामुळे संबंधित शाळांमधील अध्यापनाचे काम प्रतिनियुक्ती दिलेल्या शिक्षकांनाच सांभाळावे लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Without 200 school teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.