सरकारच्या घरवापसीची वेळ आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:12 AM2019-01-14T01:12:49+5:302019-01-14T01:14:00+5:30

गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मूलभतू गरजा व सोयीसुविधांकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. हे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचे काम करीत आहे.

The time for the government's reception came | सरकारच्या घरवापसीची वेळ आली

सरकारच्या घरवापसीची वेळ आली

Next
ठळक मुद्देअशोक चव्हाण : वडेट्टीवारांनी व्यक्त केला सर्व जागा निवडून आणण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मूलभतू गरजा व सोयीसुविधांकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. हे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचे काम करीत आहे. अशा दबंगशाही सरकारच्या घरवापसीची वेळ आली आहे, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी दिला.
प्रदेश काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या आगमनानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर मार्गावरील एका लॉनवर रविवारी जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला खा.चव्हाण संबोधित करीत होते. यावेळी मंचावर विधिमंडळ उपगट नेते आ.विजय वडेट्टीवार, अ.भा.काँग्रेस कमिटीचे सचिव आणि विदर्भ समन्वयक आशिष दुवा, माजी खा.मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ.आशिष देशमुख, आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आनंदराव गेडाम, अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष राजू वाघमारे, अतुल लोंढे, किशोर गजभिये, रविंद्र दरेकर, जिल्हा प्रभारी सुरेश भोयर, अमर वराडे, अनंत घारड, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे, जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, डॉ.नितीन कोडवते, डॉ.नामदेव किरसान, प्रदेश प्रतिनिधी सगुणा तलांडी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी खा.कोवासे म्हणाले, काँग्रेसच्या राजवटीत गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्टÑ व देशाचा विकास झाला. मात्र भाजपप्रणित सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात विकासाचा पत्ता नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात गेल्या साडेचार वर्षात एकही ठोस काम झाले नाही. जी कामे आता सुरू आहेत, ती काँग्रेसच्या कार्यकाळातच मंजूर झाली होती. या सरकारने केवळ भूमिपूजन करण्यापलिकडे काहीही केले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रास्ताविकातून माजी डॉ.उसेंडी म्हणाले, तत्कालीन काँग्रेस सरकार व तत्कालीन पालकमंत्री आर.आर.पाटील यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठ निर्माण झाले. मात्र गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात भाजप सरकारला विद्यापीठाला शासकीय जमीन उपलब्ध करून देता आली नाही. कृषी महाविद्यालयाला १० टक्के निधी उपलब्ध करून दिला नाही. उलट गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी व ओबीसी असा वाद या सरकारने निर्माण केला. ओबीसींच्या आरक्षणाकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. माजी आ.आशिष देशमुख म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या तीव्र झाल्यामुळेच नक्षलवाद फोफावला आहे. येथील युवकांच्या हाताला काम देणे अत्यावश्यक आहे. या जिल्ह्याचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. मात्र येथील पालकमंत्री उदासीन आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी राजाची नाही तर जनतेच्या व्यथा समजून घेणाऱ्या सेवकाची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मंचावर जि.प.सदस्य रूपाली पंदिलवार, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, केसरी उसेंडी, गौरव अलाम, नितेश राठोड, प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी पंकज गुड्डेवार, प्रभाकर वासेकर, कुणाल पेंदोरकर, मनोहर पोरेटी, पी.टी.मसराम, पांडुरंग घोटेकर, डी.डी.सोनटक्के, नेताजी गावतुरे, काशिनाथ भडके, विनोद खोबे, किशोर वनमाळी, रवींद्र शहा, मुश्ताक हकीम, संजय चरडुके, रहीम शेख, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष अधीर इंगोले, महासचिव वैभव कडस्कर, नंदू वाईलकर, दिवाकर मिसार, राकेश रत्नावार, एजाज शेख, अमोल भडांगे, प्रतीक बारसिंगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक सतीश विधाते यांनी तर आभार महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मतभेद विसरून काम करणार- वडेट्टीवार
जिल्ह्यातील तीनही विधानसभा आणि लोकसभेच्या जागा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करताना आ.विजय वडेट्टीवार यांनी सर्व मतभेद विसरून कामाला लागण्याचे संकेत दिले. यामुळे जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात येणार का, अशी चर्चा श्रोत्यांमध्ये सुरू होती.
यावेळी आपल्या भाषणात वडेट्टीवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही टिकास्त्र सोडले. या सरकारमधील पुढारी सुरुवातीपासून केवळ फोल आश्वासने देऊन सर्वसामान्य जनतेची फसवणूक करीत आहेत. अशा जुमलेबाज सरकारचे पितळ उघडे पाडण्यासाठीच काँग्रेसची ही जनसंघर्ष यात्रा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे येथील शेतकरी नागविला जात आहे. तीन राज्यात सत्ता येताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिलेला शब्द पाळत जाचक अटींविना कर्जमाफी दिली. पण महाराष्ट्रात अजूनही शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यमान सरकारने आर्थिक मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण दिले यावर आमचा आक्षेप नाही, मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ४२ टक्के ओबीसी लोकांना केवळ ६ टक्के आरक्षण आहे हे सरकारला दिसत नाही का? असा सवाल त्यांनी केला. आदिवासी व गैरआदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. पाच वर्षांच्या काळात महाराष्टÑ राज्यावरील कर्जाचा बोजा अडीच लाख कोटीवरून साडेपाच लाख कोटींवर गेला आहे. निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य देऊ, असे स्टॅम्प पेपरवर लिहून देणारे बेईमान झाले. या फेकू अणि फसणवीस सरकारच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.
जनता म्हणेल त्यालाच उमेदवारी
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसमधून ४-५ लोक इच्छुक आहेत. पक्षाचा विजय नक्की होणार याचे हे संकेत आहे. पण कोणी कोणाच्या जवळचा आहे यावर उमेदवारी ठरत नाही, तर जनता ज्याच्या बाजुने असेल त्याला उमेदवारी मिळेल. हीच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भूमिका असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.

क्षणचित्रे
चंद्रपूर मार्गावरील पूलखल फाट्यापासून ते डॉ. नामदेव उसेंडी यांच्या घरापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर इंदिरा गांधी चौक ते सभास्थळी रॅली पोहोचली.
बाराही तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जवळपास पाच हजार लोकांची उपस्थिती होती.
जिल्हा काँग्रेस, महिला काँग्रेस व एनएसयूआयतर्फे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, आ.वडेट्टीवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मंचावर नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची झालेली गर्दी श्रोत्यांसाठी चर्चेचा विषय झाली होती.

Web Title: The time for the government's reception came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.