ठळक मुद्देरानडुकरांच्या अवैध शिकारीने घेतला वाघिणीचा बळीवनविभागाचे विद्युत तारांच्या अवैध सापळ््यांकडे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली - रानडुकरांना पकडण्यासाठी लावलेल्या अवैध विद्युत प्रवाहित तारांमध्ये अडकून एक वाघीण ठार झाल्याचे शुक्रवारी सकाळी चपराळा अभयारण्याजवळच्या शेतात निदर्शनास आले आहे.
चामोर्शी तालुक्यातील मारोडा जामगिरी जंगलातील शेताजवळ शुक्रवारी पहाटे पट्टेदार वाघीण व रानडुक्कर मृतावस्थेत आढळून आले. त्यांची तपासणी केली असता, त्यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे निदर्शनास आले.
गडचिरोलीच्या जंगलात असलेल्या रानडुकरांच्या शिकारीसाठी शिकार करणारे जंगलाजवळ किंवा शेताजवळ विद्युत तारा लावून ठेवतात. या तारांमध्ये अडकून विजेचा धक्का लागून संबंधित जनावर जागीच ठार होत असते. याच तारांनी गुरुवारी रात्री एका वाघिणीचा बळी घेतला.
ही वाघीण आरमोरी देसाईगंज भागात फिरत असल्याचे गावकऱ्यांचे सांगणे आहे. तिने या भागात दोघांवर हल्लाही चढविला होता. त्यामुळे तिला चपराळा संरक्षित क्षेत्रात आणून सोडण्यात आले होते. मात्र रात्री रानडुकराच्या मागे धावताना वाघीण व रानडुक्कर असे दोघेही या तारांमध्ये अडकले असावेत आणि मृत्युमुखी पडले असावेत असा कयास व्यक्त केला जातो आहे.
शेताचे रक्षण असो वा अवैध शिकार, त्याकरिता लावण्यात येत असलेल्या विद्युत तारांमध्ये वाघ किंवा वन्यजीव सापडून प्राणास मुकण्याच्या घटना एवढ्यात अधिक घडल्या आहेत. वनविभागाला या अवैधरित्या लावण्यात येत असलेल्या तारा माहित असूनही त्याकडे त्याचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या वाघिणीचा मृत्यू विद्युत प्रवाहाने झाला नसल्याचे वनविभागाचे म्हणणो असले तरी, त्यातील सत्यता अंतिम तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.