आरमोरी बाजार समितीवर सावकार गटाचा झेंडा

By admin | Published: May 9, 2017 12:45 AM2017-05-09T00:45:57+5:302017-05-09T00:45:57+5:30

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेची व महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत...

Swaraj Group on Armory Market Committee | आरमोरी बाजार समितीवर सावकार गटाचा झेंडा

आरमोरी बाजार समितीवर सावकार गटाचा झेंडा

Next

शहरातून काढली विजयी रॅली : सावकार गटाचे १८ पैकी १७ सदस्य विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेची व महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या सावकार गटाने १८ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले आहे. विरोधी असलेल्या शेतकरी संघर्ष पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १७ मे रोजी पार पडली. या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वडसा, कुरखेडा, कोरची या तालुक्यातील १० मतदान केंद्रांवर निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे आरमोरी तालुक्यात चार केंद्र, देसाईगंज तालुक्यात दोन केंद्र, कुरखेडा तालुक्यात तीन केंद्र व कोरची तालुक्यातील एका केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडली.
विजयी उमेदवारांमध्ये सेवा सहकारी मतदार संघ, सर्वसाधारण गटातून सहकार पॅनलचे हरिशचंद्र डोंगरवार, दोषहर फाये, खेमराज हुलके, रामसुराम काटेंगे, व्यंकटी नागीलवार, ईश्वरी पासेवार, देवाजी पिल्लारे हे उमेदवार विजयी झाले आहेत. ओबीसी गटातून खिरसागर नाकाडे अविरोध निवडून आले आहेत. महिला गटातून कलावती कानतोडे, ललीता टिकले या विजयी झाल्या आहेत. विमुक्त व भटक्या जाती गटातून रत्नाकर धाईत विजयी झाल्या आहेत. ग्राम पंचायत मतदार संघातील सर्वसाधरण गटातून विनोद खुणे, कैलास राणे, दुर्बल घटकातून मुखरू वाघाडे, अनुसूचित जाती, जमाती गटातून पुष्पलता मासरकर, व्यापारी अडते मतदार संघातून गुरूमुखदास नागदेवे, हैदरभाई पंजवानी विजयी झाले आहेत. हे सर्व उमेदवार सहकार पॅनलचे आहेत. शेतकरी संघर्ष पॅनलचे उमेदवार असलेले हमाल मापारी मतदार संघाचे नवलाजी ठाकरे हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत.
सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून शेतकरी संघर्ष पॅनलचे उमेदवार उमाशंकर ग्यानबा हारगुळे, ईश्वर सखाराम खोडवे, आसाराम विठोबा प्रधान, विठ्ठलराव शेंडे, नरेश टिकाराम टेंभूर्णे, सहकारी संस्था महिला मतदार संघातून सरस्वती साधो कांबळी, भटक्या विमुक्त जाती, जमातीमधून राजेंद्र नक्टू दिघोरे, ग्राम पंचायत संघातून दादाजी तुकाराम भर्रे, चंदू पांडुरंग गरफडे, तुलाराम चैताराम मडावी, सुजीत मिस्त्री, कवडू लक्ष्मण सहारे, ग्राम पंचायत अनुसूचित जमाती मतदार संघातून नाजूक वट्टी पराभूत झाले आहेत. व्यापारी अडते गटातील माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी, विलास दादाजी ठेंगरी पराभूत झाले आहेत. हमाल मापारी तोलारी संघातून सावकार गटाचे दौलत रामकृष्ण ठाकरे पराभूत झाले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार भवनात मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था गडचिरोलीचे नितीन मस्के यांनी काम पाहिले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुशील वानखेडे, पर्यवेक्षक गोपाल वेलेकर यांनी सहकार्य केले.
निकालानंतर विजयी रॅली काढण्यात आली. प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी बाजार समितीचे नवनियुक्त सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, आ. क्रिष्णा गजबे, जि. प. सदस्य संपत आळे, रमाकांत ठेंगरी, मित्तलेश्वरी खोब्रागडे, नाजूक पुराम, भाग्यवान टेकाम, सदाराम नरोटे, देसाईगंजचे सभापती मोहन गायकवाड, रोशनी पारधी, अशोक नलेश्वर, धानोरा पं. स. सभापती अजमन राऊत उपस्थित होते. यावेळी अरविंद पोरेड्डीवार यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Swaraj Group on Armory Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.