Surrender of three Naxals with one woman in Gadchiroli | गडचिरोलीत एका महिलेसह तीन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

ठळक मुद्देनक्षल चळवळीला हादरा 3 नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

गडचिरोली : प्रत्येकी दोन लाख रूपयांचे बक्षीस असलेल्या तीन नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे शनिवारी (23 डिसेंबर) आत्मसमर्पण केले. यामध्ये एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. सतीश उर्फ हिळमा कोसा होळी, पाकली उर्फ पगणी अडमू पोयामी व मनोज उर्फ दशरथ सखाराम गावडे अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.

सतीश होळी हा आॅगस्ट २०१४ मध्ये छत्तीसगड राज्यातील दक्षिण बस्तर दलममध्ये भरती झाला होता. आॅक्टोबर २०१७ मध्ये भामरागड दलममध्ये कार्यरत होता. कुरेनारकडे जाणाऱ्या मार्गावर २०१६ मध्ये घडलेली चकमक, २०१७ मधील गुंडूरवाही चकमक या कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. पाकली पोयामी ही परसेगड दलममध्ये मे २०१७ मध्ये सहभागी होती. डिसेंबर २०१७ पर्यंत ती सांड्रा दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. छत्तीसगड राज्यातील मुकवाडा चकमक, सागमेंटा चकमक यामध्ये तिचा समावेश होता.

मनोज गावडे हा २०११ मध्ये केकेडी दलममध्ये भरती झाला. नक्षलवाद्यांच्या जेवणची व्यवस्था करणे, सभा घेण्याकरिता गावकऱ्यांना जमा करणे आदी कामे तो करीत होता. डिसेंबर २०१७ पर्यंत तो केकेडी दलमध्येच कार्यरत होता. लेकुरबोडी चकमक, फुलगोंदी चकमक यामध्ये त्याचा समावेश होता. एकाच वेळी तीन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने २०१७ या वर्षात आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या आता २२ झाली आहे.


Web Title: Surrender of three Naxals with one woman in Gadchiroli
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.