धानाच्या पिकात भाजीपाल्याचा यशस्वी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:14 PM2018-10-22T23:14:29+5:302018-10-22T23:15:16+5:30

धानाचे पीक आणि भाजीपाला हे समीकरण तसे जुळत नाही. पण प्रयोगशिलतेवर भर देत येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शेतीत चक्क धानाच्या पिकातच दोडक्याचे वेल बहरविण्याचा यशस्वी प्रयोग ‘आत्मा’ने साकारला आहे. असाच प्रयोग जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात करून स्वत: वापरण्यासोबतच विक्रीसाठीही भाजीपाला पिकवू शकतात.

Successful use of vegetables in rice crop | धानाच्या पिकात भाजीपाल्याचा यशस्वी प्रयोग

धानाच्या पिकात भाजीपाल्याचा यशस्वी प्रयोग

Next
ठळक मुद्दे‘आत्मा’ची कल्पना प्रत्यक्षात : कृषी विज्ञान केंद्राच्या शेतीत बहरले दोडके

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानाचे पीक आणि भाजीपाला हे समीकरण तसे जुळत नाही. पण प्रयोगशिलतेवर भर देत येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शेतीत चक्क धानाच्या पिकातच दोडक्याचे वेल बहरविण्याचा यशस्वी प्रयोग ‘आत्मा’ने साकारला आहे. असाच प्रयोग जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात करून स्वत: वापरण्यासोबतच विक्रीसाठीही भाजीपाला पिकवू शकतात.
दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना सकस आणि ताजा भाजीपाला मिळत नाही. गडचिरोलीसारख्या अपुऱ्या सिंचन सुविधा असणाऱ्या जिल्ह्यात तर खरीपातील धानाच्या पीकाशिवाय इतर पीक घेण्याची कल्पनाही शेतकऱ्यांच्या डोक्यातही येत नाही. त्यामुळे दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबांना दैनंदिन वापरासाठी भाजीपाला मिळत नाही. या परिस्थितीचा विचार करून आता आदिवासी नागरिकांच्या घरालगत परसबाग फुलवून त्यात भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे. मात्र त्याआधीच आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या शेतीत धानपिकासोबत भाजीपाला लागवडीची कल्पना मांडली.
अनेक दिवस पाण्यात राहणाऱ्या धानाच्या पीकासोबत त्याच जमिनीत भाज्यांची लागवड करणे शक्य नव्हते. त्यासाठी प्लास्टिकच्या पोत्यांना अर्ध्यातून कापून त्यात माती भरण्यात आली. ते धानाच्या पीकात १०-१० फुटांवर मांडण्यात आले. त्यानंतर पोत्यातील मातीचा शेतातील मातीशी थेट संबंध येण्यासाठी पोत्याचा खालील भाग कापण्यात आला. त्या पोत्यात विविध प्रकारच्या दोडक्याच्या बिया लावण्यात आल्या. खरीपाच्या धानासोबतच पोत्यातील दोडक्याचे वेलही अल्पावधीतच बहरून त्याला चांगले दोडके लागले.
पोत्याचे खालील तोंड मोकळे असल्याने शेतजमिनीतून मिळणारे पोषक घटकही पोत्यातील मातीला मिळाले. शिवाय आवश्यक तेवढेच पाणी पोत्यातील मातीत राहून दोडक्याच्या वेलांची योग्य वाढ झाली. याच पद्धतीने खरीप आणि रबी हंगामातही वेगवेगळ्या भाज्यांचे उत्पन्न घेता येऊ शकते, असे आत्माकडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना धानाच्या पीकासोबतच भाजीपालाही घेता येऊ शकतो हे या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पद्धतीचा प्रयोग जरूर करावा. त्यांना योग्य ते मार्गदर्शन ‘आत्मा’कडून केले जाईल.
- डॉ.प्रकाश पवार, प्रकल्प संचालक, आत्मा

Web Title: Successful use of vegetables in rice crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.