Speed of pre-farmer cultivation | खरीपपूर्व शेती मशागतीला वेग
खरीपपूर्व शेती मशागतीला वेग

ठळक मुद्देसकाळी शेतांमध्ये गर्दी : काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टाकण्याची कामे जोमात

लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदू संकलनाचे काम सुरू आहे. परंतु सदर काम अनेक गावांमध्ये नाही. ज्या गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे, अशा गावांसह अन्य गावांमध्येही शेतकरी खरीप हंगामपूर्व मशागतीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टाकणे यासारखी कामे सध्या सुरू आहेत. त्यामुळे अनेक गावातील शेतांमध्ये शेतकरी व मजुरांची गर्दी दिसून येते.
खरीपपूर्व हंगामातील मशागतीत काडीकचरा काढणे, वाळलेले गवत साफ करणे, वेली जाळणे, शेणखत पसरविणे यासारखी कामे मागील आठवड्यापासून सुरू आहेत. विशेष म्हणजे अक्षय तृतीया सणानंतर या कामाला वेग आला आहे. शेतातील पाळींवर उरलेले तूर व तिळाचे देठ, तसेच शेतातील तणस घरी नेणे यासारखी कामे सुरू आहेत. अनेक शेतकरी बैलबंडीद्वारे शेणखत टाकत आहेत तर ज्यांच्याकडे बैलबंडी नाही, असे शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेणखत टाकत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पाऊस उशिरा येत आहे. त्यामुळे पेरणी, कापणी, मळणी ही कामे लांबतात. परिणामी धान उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. धानाला मिळणारा भाव मात्र अद्यापही धानपट्ट्यातील ज्वलंत समस्या आहे. खरीप हंगामपूर्व मशागतीतून धानपिकाला लागणारा खर्च वजा करता धानाची विक्री करून हातात काहीच शिल्लक राहत नाही, असे शेतकरी सांगतात.
तीन दशकांपासून विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. त्यामुळे कुटुंब वाढले, परंतु शेती विभागली. मनुष्यबळही कमी झाले. कृषी क्षेत्रात आधुनिक यंत्र, अवजारे आली. त्यामुळे जनावरांची गरज कमी भासू लागली. बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने अनेक गावातील पशुधन कमी झाले. याचा परिणाम शेणखतावर झाला. पूर्वी अनेक गावाच्या बाहेर शेणखताचे मोठमोठे ढिगारे दिसून येत असत. परंतु आता ते अत्यल्प कमी आहेत. ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची समज आहे, असे अनेक शेतकरी शेणखत विकत घेऊन शेतात टाकतात. सध्या कृषी विभागाच्या जनजागृतीमुळे अनेकांना रासायनिक खतांचे दुष्परिणाम माहित होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे कल आहे.

पशुधन घटल्याने पेरणीकाळात मशागतीवर परिणाम
काही वर्षांपूर्वी अनेक शेतकऱ्यांकडे गाय, बैल, म्हैस, शेळ्या यासारखी जनावरे होती. संयुक्त कुटुंबात जेवढे सदस्य अधिक त्यापेक्षा जनावरांची संख्या जास्त होती. जनावरांची देखभाल कुटुंबातील प्रत्येक सदस्य करायचा. परंतु आता यांत्रिकीकरणामुळे पशुधन मोठ्या प्रमाणावर घटले. प्रत्येक गावांमध्ये यांत्रिक साधने असले तरी वेळीच ती उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकºयांना पेरणीकाळात मशागतीसाठी प्रतीक्षा करावी लागते.


Web Title: Speed of pre-farmer cultivation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.