बीआरओअभावी रस्त्यांची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:04 PM2018-10-15T23:04:58+5:302018-10-15T23:05:30+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागात रस्ते, पूल बनविण्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या बीआरओ (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन) तुकडीचे स्थानांतरण करण्यात आले आहे.

Road work in the absence of BRO | बीआरओअभावी रस्त्यांची कामे ठप्प

बीआरओअभावी रस्त्यांची कामे ठप्प

Next
ठळक मुद्दे२० वर्षे होते कार्यरत : कोट्यवधींची यंत्रसामुग्री धूळखात; परत काम देण्याची होत आहे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागात रस्ते, पूल बनविण्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या बीआरओ (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन) तुकडीचे स्थानांतरण करण्यात आले आहे. तेव्हापासून दुर्गम भागातील रस्ते निर्मितीचे काम ठप्प पडले आहे. एमआयडीसी परिसरात असलेली बीआरओची निवासस्थाने ओसाड पडली असून जेसीबी, ट्रक व इतर साहित्य अशी कोट्यवधी रूपयांची मालमत्ता धूळखात पडून आहे.
जिल्ह्यात नक्षलवादाचा प्रभाव आहे. नक्षल्यांचा रस्ते, पूल व इतर विकास कामांना विरोध असल्याने ही विकास कामे करणाºया कंत्राटदाराचे साहित्य जाळत होते. परिणामी कंत्राटदार जिल्ह्यात काम करण्यास तयार नव्हते. भामरागड, धानोरा, एटापल्ली, सिरोंचा, कोरची, अहेरी या तालुक्यातील जंगलव्याप्त गावांना रस्ते नव्हते. शासनाकडून निधी प्राप्त होत असला तरी बांधकाम करणारी यंत्रणा नसल्याने सदर निधी परत जात होता.
दुर्गम भागात रस्ते तयार केल्यास दळणवळण वाढून या भागाचा विकास होईल, त्याचबरोबर नक्षल्यांच्या हालचालीवरही नियंत्रण ठेवता येईल, या उद्देशाने शासनाने गडचिरोली जिल्ह्यात बीआरओची तुकडी १९९२ मध्ये पाठविले. या तुकडीचे मुख्यालय कोटगलजवळ एमआयडीसी परिसरात उभारून जिल्हाभरात रस्ते व पूल बांधकामाला सुरुवात केली. अनेक दुर्गम गावांपर्यंत मार्ग पोहोचविण्यात बीआरओने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. बीआरओने बांधलेले रस्ते, पूल आजही शाबूत आहेत. रस्ते व पूल झाल्याने दुर्गम भागाच्या विकासाला चालना मिळून नक्षल चळवळीलाही हादरा बसला होता. मात्र अचानक शासनाने २०१३ मध्ये बीआरओचे स्थानांतरण अरूणाचल प्रदेशात केले. तेव्हापासून दुर्गम भागातील रस्त्यांचे काम ठप्प पडले आहे. बीआरओच्या तुकडीला पुन्हा बोलवावे, अशी मागणी आहे.
‘ते’ रस्ते व पूल अजूनही सुस्थितीत
बीआरओ हा केंद्र शासनाचा विभाग आहे. बीआरओने केलेली सर्वच कामे दर्जात्मक होती. १५ ते २० वर्षांपूर्वी बांधलेली कामे अजूनही सुस्थितीत आहेत. बीआरओचे स्थानांतरण झाल्यानंतर विकास कामे ठप्प पडली आहेत. सद्य:स्थितीत काही कामे कंत्राटदारांच्या मार्फत केली जात आहेत. मात्र या कामांचा दर्जा सुमार असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. काही ठिकाणी तर बांधकाम न करताच कंत्राटदार पैसे उचलून मोकळे होत आहेत. याचा काही वाटा शासकीय अधिकाºयांनाही मिळत आहे. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भाग असल्याने या भागात वरिष्ठ अधिकारी पोहोचत नाही. याचा दुरूपयोग आता कंत्राटदार व अधिकारी घेत आहेत.
बीआरओ नक्षल्यांवर भारी
नावावरूनच बीआरओ हा विभाग अतिशय कठीण ठिकाणी रस्ते बांधण्याचे काम करते. या विभागाकडे रस्ते व पूल बांधणारे सर्व तंत्रज्ञ, यंत्रसामुग्री तसेच संरक्षण यंत्रणा उपलब्ध आहे. बीआरओची ताकद नक्षल्यांवरही भारी पडत होती. परिणामी नक्षल्यांचे गड समजल्या जाणाºया गावांमध्ये बीआरओने पूल व रस्त्यांचे बांधकाम करूनही एक-दोन घटना वगळता नक्षल्यांनी कोणतीही विपरित घटना केली नाही. यावरून बीआरओ हे नक्षल्यांवर भारी पडले होते, असे दिसून येते.

Web Title: Road work in the absence of BRO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.