रणरागिणींचा दारूअड्ड्यांवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:29 AM2018-02-22T00:29:00+5:302018-02-22T00:29:32+5:30

गावातील अवैध दारू विक्रीला कंटाळून ग्रामसभेत गावातील दारू पूर्णत: बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

 Ranaragini raid on liquor bars | रणरागिणींचा दारूअड्ड्यांवर छापा

रणरागिणींचा दारूअड्ड्यांवर छापा

Next
ठळक मुद्देपाच ठिकाणच्या भट्ट्या उद्ध्वस्त : दामपुरातील बचत गटांच्या महिलांचा पुढाकार

ऑनलाईन लोकमत
मुलचेरा : गावातील अवैध दारू विक्रीला कंटाळून ग्रामसभेत गावातील दारू पूर्णत: बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारला बचत गटाच्या महिलांनी एकत्र येत गावालगतच्या मोहफूल दारूअड्ड्यावर धाड टाकून तब्बल पाच दारूअड्डे उद्ध्वस्त केले. या अड्ड्यांवरून दारू व सडवा असा मिळून एकूण १८ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
दामपूर येथे गेल्या अनेक दिवसांपासून दारूची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात होती. अनेक युवक दारूच्या आहारी गेले. तसेच नागरिकही मोठ्या प्रमाणात व्यसनाधिन झाले होते. सकाळी उठल्यापासून तर रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास गावात सर्रासपणे दारू विकल्या जात होती. या संदर्भात १९ फेब्रुवारी रोजी ग्रामसभा बोलावून गावात १०० टक्के दारूबंदी करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. तसेच गावालगतच्या दारूअड्डे उद्ध्वस्त करण्याचे ठरविले. त्यानुसार बचत गटांच्या महिला सकाळी ६ वाजता एकत्र जमल्या. त्यांनी धाडसत्र सुरू केले. दरम्यान त्यांना पाच ठिकाणी मोहफूल दारूचे मोठे अड्डे सापडले. या ठिकाणी दारूने भरलेले कॅन, मडके, मोहफूल भरलेले ड्रम आढळून आले. कारवाईदरम्यान अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक होळकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. पोलिसांनी पाच दारू विक्रेत्या आरोपींना अटक केली आहे. यामध्ये रघुनाथ आलाम, ईश्वर मडावी, हनमंतू बुरमवार, कमला बुरमवार, व्यंकटेश बुरमवार, बिजाराम सिडाम, महेश शंकर बुरमवार आदींचा समावेश आहे.
दामपूर येथे तीन ते चार वर्षांपूर्वी सर्व नागरिक महिला बचत गट व ग्रामसभेच्या सहमतीने दारूबंदी करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा दारूविक्री खुलेआम सुरू झाली. या दारू विक्रीमुळे मद्यपींकडून महिलांना त्रास होत होता. त्यामुळे बचत गटांच्या महिलांनी दारू विक्रेत्यांविरोधात कंबर कसली व त्यांचे दारूअड्डे उद्ध्वस्त केले. दामपूर येथील महिलांचा आदर्श इतर महिलांनी घेण्याची गरज आहे. दामपुरातील महिलांनी दारू विक्रेत्यांच्या नावाची यादी अहेरी पोलिसांना दिली.

Web Title:  Ranaragini raid on liquor bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.