संततधारेमुळे पावसाळी वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:28 PM2018-12-17T22:28:57+5:302018-12-17T22:30:22+5:30

जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून सुरू झालेला रिमझिम पाऊस रात्रीपर्यंत थांबलेला नव्हता. भामरागडसह इतर काही भागात तर दमदार पाऊस झाला. संततधार पावसामुळे दिवसभर पावसाळी वातावरण होते. यामुळे तापमानात कमालीची घट होऊन सर्वत्र गारवा पसरला आहे. पावसाने धानासह कापूस आणि तुरीचेही नुकसान झाले आहे.

Rainy atmosphere due to subsistence | संततधारेमुळे पावसाळी वातावरण

संततधारेमुळे पावसाळी वातावरण

googlenewsNext
ठळक मुद्देगारव्याने जिल्हा गारठला : खरेदी केंद्रांवरील धानासह कापूस, तूर पिकाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून सुरू झालेला रिमझिम पाऊस रात्रीपर्यंत थांबलेला नव्हता. भामरागडसह इतर काही भागात तर दमदार पाऊस झाला. संततधार पावसामुळे दिवसभर पावसाळी वातावरण होते. यामुळे तापमानात कमालीची घट होऊन सर्वत्र गारवा पसरला आहे. पावसाने धानासह कापूस आणि तुरीचेही नुकसान झाले आहे.
मागील आठ दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. मागील आठवड्यात अशाच अवकाळी पावसाने हजेरी अचानक हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने उसंत घेतली. मात्र पुन्हा रविवारी रात्री पावसाच्या हलक्या सरी आल्या. सोमवारी सकाळपासून मात्र पावसाने अधिकच जोर धरला.
आॅक्टोबर महिन्यापासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे छत्र्या, रेनकोट अडगळीत पडले होते. पण सोमवारच्या पावसाने पुन्हा पावसाळी साधने बाहेर निघाली. ज्या शेतकऱ्यांचे धानाचे चुरणे झाले, अशा शेतकºयांनी खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी आणला होता. खरेदी केंद्रांवर शेकडो पोत्यांची थप्पी लागली आहे. त्या धानावर ताडपत्र्या झाकल्या असल्या तरी ताडपत्र्या अपुºया पडत असल्यामुळे सदर धान भिजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतात लावून ठेवलेले धानाचे पुंजनेही पावसात सापडले आहेत. ताडपत्री झाकून पावसापासून धानाचा बचाव करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. अगोदरच थंडीचे दिवस, त्यात पाऊस सुरू झाल्याने तापमानात कमालीची घट झाली आहे. शित वाऱ्यांमुळे सोमवारी दिवसभर लोकांना गरम कपड्यांचा आसरा घ्यावा लागला.
पुढील दोन दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर अतिथंडीमुळे नागरिकांच्या प्रकृतीवरही परिणाम होणार आहे.
दिवसभर विजेचा लपंडाव
पावसाला सुरूवात झाल्यापासूनच गडचिरोली शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला. सोमवारी दिवसभर व रात्री उशीरापर्यंत विजेचा लपंडाव सुरूच होता. वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्याने गडचिरोलीतील सामान्य नागरिक, व्यावसायिक व शासकीय कार्यालयातील कर्मचारी त्रस्त होते. दुर्गम भागातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता.
एटापल्लीतील विज्ञान प्रदर्शनीला फटका
जिल्हा परिषद हायस्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. बाहेर पेंडॉल टाकण्यात आला होता. मात्र रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. त्यामुळे बांधलेला कापडी पेंडॉल कोसळला.
कापणी झालेल्या धानाची नासाडी
जोपर्यंत धानाचा काटा होत नाही, तोपर्यंत सदर शेतमालाची जबाबदारी शेतकऱ्यांची राहते. पावसामुळे धान भिजल्यास शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. ज्या धानाचा काटा झाला तो धान मात्र आदिवासी विकास विभागाचा असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. अवकाळी पावसामुळे हजारो क्विंटल धान भिजला आहे. शेतकरी व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने ताडपत्री झाकून पावसापासून धानाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा प्रयत्न अपुरा पडत आहे. शेकडो पोते झाकण्यासाठी तेवढ्या ताडपत्री आणायच्या कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कापसासह भाजीपाल्याचेही नुकसान
चामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा व काही भागातील गडचिरोली तालुक्यात कापसाचे उत्पादन घेतले जाते. कापसाचा पहिला तोडा आटोपला. दुसऱ्या तोड्याचे काम सुरू होते. अशातच पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कापूस भिजला आहे. जो कापूस जमिनीवर पडला, त्याला माती लागत असल्याने सदर कापूस खराब होतो. या कापसाला अत्यंत कमी भाव मिळतो. परिणामी शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो.
ढगाळ वातावरणामुळे मागील आठ दिवसांपासून पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धुके पडत आहेत. धुक्यांमुळे पिकांचे फूल झडते. तसेच पिकांवर चिकटपणा निर्माण होतो. यामुळे झाडांची वाढ खुंटते. एकंदरीतच तूर, पोपट, हरभरा, ज्वारी, मिरची व इतर भाजीपाला पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Rainy atmosphere due to subsistence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.