People poisoning of drinking water in Kurkheda in Gadchiroli district | गडचिरोलीच्या कुरखेडात थिमेटयुक्त पाणी प्यायल्याने नागरिकांना विषबाधा
गडचिरोलीच्या कुरखेडात थिमेटयुक्त पाणी प्यायल्याने नागरिकांना विषबाधा

ठळक मुद्देतिघांना संशयावरून ताब्यात घेतले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: कुरखेडा तालुक्यातील धमदीटोला येथील सार्वजनिक विहिरीत थिमेटयुक्त पाणी आढळल्याने गुरुवारी सकाळी गावात खळबळ उडाली आहे. हे थिमेटयुक्त पाणी प्यायल्याने काही नागरिकांना विषबाधा झाली. वैद्यकीय अधिकारी व पोलीस गावात पोहचले असून त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
थिमेट ही एक स्फोटक रसायनिक पावडर असून तिचा उपयोग शेतातील वा घरातील वाळवी नष्ट करण्यासाठी तसेच वन्यपशूंना पळवून लावण्यासाठी केला जातो. या पावडरीला कणकेत मिसळून त्याचे गोळे शेतात टाकले जातात. एखाद्या जनावराने ते तोंडात घेऊन चावले असता त्याचा स्फोट होतो व तो वन्यपशू जखमी होतो. गावकरी याचा वापर नेहमी करीत असतात.
कुरखेडापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या धमदीटोला गावाचा समावेश नान्ही ग्रामपंचायतींतर्गत होतो. गावातील काही महिला गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या. या पाण्याने बनवलेला चहा घेताच दोन-तीन जणांना उलट्या होऊ लागल्या. काही महिलांनी स्वयंपाक करण्यास सुरु वात केली. परंतु स्वयंपाकालाहीही दुर्गंधी येऊ लागली. काही क्षणातच ही वार्ता गावभर पसरली. घटनेची माहिती मिळताच भाजपचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य नाजुक पुराम घटनास्थळी गेले. वैद्यकीय अधिकारी डॉ.दामले व सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर हेही आपल्या सहकाऱ्यांसह धमदीटोला येथे पोहचले. त्यांनी चर्चा करु न माहिती घेतली. यावेळी सार्वजनिक विहिरीची पाहणी केली असता त्यात थिमेट हा रासायनिक पदार्थ टाकण्यात आल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले.
यावेळी सर्वांनी विहिरीतील पाणी पिऊ नये, असे आवाहन करण्यात आले. डॉक्टरांनी विषबाधा झालेल्या नागरिकांची तपासणी करु न औषधोपचार केला. याप्रसंगी सरपंच वर्षा धुर्वे, उपसरपंच सुखदेव कोरेटी हेही उपस्थित होते.
नागरिकांनी वेळीच साविधगरी बाळगल्याने व वैद्यकीय अधिकारी वेळेवर पोहचल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर विषबाधा होण्यापासून बचावले. या विहिरीत ही थिमेट पावडर कुणी टाकली, याचा शोध पोलिस घेत आहेत. संशयावरून तिघांना ताब्यात घेतले आहे.


Web Title: People poisoning of drinking water in Kurkheda in Gadchiroli district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.