ग्रामपंचायतींच्या आॅनलाईन नामांकनाला इंटरनेटचा ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 11:10 PM2018-02-08T23:10:56+5:302018-02-08T23:11:16+5:30

जिल्ह्यात येत्या २५ फेब्रुवारीला १६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक आणि २०७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी नामांकन दाखल करणे सुरू आहे.

Online 'anonymous' name of Gram Panchayats | ग्रामपंचायतींच्या आॅनलाईन नामांकनाला इंटरनेटचा ‘खो’

ग्रामपंचायतींच्या आॅनलाईन नामांकनाला इंटरनेटचा ‘खो’

Next
ठळक मुद्देउमेदवारांची धावपळ : चार दिवसांत केवळ ११ नामांकन दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात येत्या २५ फेब्रुवारीला १६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक आणि २०७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी नामांकन दाखल करणे सुरू आहे. मात्र आॅनलाईन नामांकन भरण्यासाठी ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधाच नसल्याने मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी गेल्या चार दिवसांत केवळ ११ नामांकन दाखल होऊ शकले. हीच परिस्थिती कायम राहिल्यास अनेकांना निवडणूक लढण्यापासून वंचित राहावे लागू शकते.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे जिल्ह्यात १६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यासाठी सरपंच व सदस्यपदासाठी इच्छुक उमेदवारांना आपले नामांकन निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर आॅनलाईन दाखल करायचे आहेत. त्यात आवश्यक असलेली माहिती भरताना इंटरनेटचा वेग अतिशय मंद राहात आहे. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी तर इंटरनेट सुविधाच नाही. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन नामांकन दाखल करावे लागत आहे. त्यातही एखादे कागदपत्र राहिल्यास गावाला येऊन पुन्हा नामांकन भरण्यासाठी जाण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. काही तालुका ठिकाणी तर इंटरनेटचा वेग अतिशय कमी राहात असल्यामुळे उमेदवारांचे नामांकन भरण्यासाठी बराच वेळ लागत आहे. यातून उमेदवारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक व पोटनिवडणूक होत आहे त्यामध्ये भामरागड, कोरची, धानोरा या तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या जास्त आहे. या तालुक्यांमध्ये इंटरनेटची समस्या अधिक तीव्र आहे. बीएसएनएल या सरकारी कंपनीने ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट सुविधा देण्यासाठी योग्य ते पाऊल उचलावे अशी अपेक्षा सर्वांकडून केली जात आहे.
नामांकनासाठी उरले दोनच दिवस
दि.५ पासून सुरू झालेली नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया दि.१० ला संपणार आहे. सर्व ग्रामपंचायती मिळून २२५ पेक्षा जास्त जागांसाठी निवडणूक होत असताना गेल्या चार दिवसात अवघे ११ नामांकन दाखल झाले आहे. आता नामांकन दाखल करण्यासाठी दि.९ व १० असे केवळ दोन दिवस शिल्लक आहे. त्यावरून परिस्थिती किती बिकट आहे याची कल्पना येते.
पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या
कोरची तालुका- ३, कुरखेडा- १०, देसाईगंज- ३, आरमोरी- ७, धानोरा- ४२, गडचिरोली- १५, चामोर्शी- २५, मुलचेरा- १०, एटापल्ली- २२, भामरागड- १५, अहेरी- २३, सिरोंचा- २४, एकूण- २०७

जातवैधतेची अट शिथिल
राखीव जागेवर सरपंच किंवा सदस्यपदासाठी नामांकन दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. केवळ वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी समितीकडे अर्ज केल्याची पावती आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र जोडल्यास उमेदवाराला त्या राखीव जागेवर निवडणूक लढविता येणार आहे.
या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक
मुदत संपत असल्यामुळे सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोरची तालुक्यातील नवेझरी, बोदालदंड, दवडी, मुरकुटी व कोटरा, धानोरा तालुक्यातील मिचगाव झाडा, पुसटोला, दुर्गापूर, झाडापापडा, गडचिरोली तालुक्यातील देवापूर, एटापल्ली तालुक्यातील हालेवारा, भामरागड तालुक्यातील मडवेली, धिरंगी, फोदेवाडा, अहेरी तालुक्यातील राजाराम, सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली आदी गावांचा समावेश आहे.

Web Title: Online 'anonymous' name of Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.