राज्यभरातील कुपोषणग्रस्त जिल्ह्यांना गडचिरोलीतून पुरविणार पोषक तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:30 PM2019-07-18T12:30:03+5:302019-07-18T12:31:47+5:30

कुपोषण निर्मूलनाच्या विविध प्रयोगानंतर आता केंद्र सरकारने संपूर्ण कुपोषणग्रस्त भागात पोषक घटक असणारा ‘फोर्टीफाईड तांदूळ’ पुरविण्याची योजना आखली आहे.

Nutritional Rice to Provide Gadchiroli District to the Malnutrition-affected Districts | राज्यभरातील कुपोषणग्रस्त जिल्ह्यांना गडचिरोलीतून पुरविणार पोषक तांदूळ

राज्यभरातील कुपोषणग्रस्त जिल्ह्यांना गडचिरोलीतून पुरविणार पोषक तांदूळ

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारचा पुढाकार टाटा ट्रस्टच्या मदतीने दोन तालुक्यात सुरू आहे प्रयोग

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुपोषण निर्मूलनाच्या विविध प्रयोगानंतर आता केंद्र सरकारने संपूर्ण कुपोषणग्रस्त भागात पोषक घटक असणारा ‘फोर्टीफाईड तांदूळ’ पुरविण्याची योजना आखली आहे. देशभरातील १७ राज्यांमध्ये ही योजना राबविली जाणार असून त्यात महाराष्ट्रातील जिल्ह्यांना हा प्रक्रियायुक्त तांदूळ पुरविण्याची जबाबदारी गडचिरोली जिल्ह्याला देण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.
राज्यात ‘लोकमत’ने पोषण परिक्रमेच्या माध्यमातून कुपोषणाच्या विषयाला नव्याने चव्हाट्यावर आणले. त्यातून सरकारी योजनांमधील उणिवा आणि उपायही सूचविले. त्यामुळे सरकारने हा विषय आणखी गांभिर्याने घेऊन कुपोषण निर्मूलनाच्या दृष्टीने नवीन उपाययोजना सुरू केल्या आहेत.
गडचिरोली या आदिवासीबहुल जिल्ह्यात केवळ ५ ते ६ वर्षांपर्यंतचे बालकच नाही तर त्यांच्या पालकांनाही पोषक आहाराची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन टाटा ट्रस्टने पायलट प्रोजेक्ट म्हणून या जिल्ह्यातील कुरखेडा आणि भामरागड या दोन तालुक्यातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून फोर्टीफाईड तांदूळ पुरवठ्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार जानेवारी २०१९ ते २०२० पर्यंतच्या कालावधीत हा प्रयोग राबविला जात आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याची तपासणी करून त्यातून येणाऱ्या निष्कर्षाच्या आधारे इतर तालुक्यांसाठी ही योजना राबविण्याचे नियोजन होते. परंतू त्यापूर्वीच केंद्र सरकारने सर्व कुपोषणग्रस्त जिल्ह्यांना हा पोषक तांदूळ पुरवण्याची तयारी सुरू केली आहे.
या पोषक तांदूळ पुरवठ्यासाठी केंद्र सरकारसोबत टाटा ट्रस्ट, बीपीसीएल या कंपन्याही आर्थिक सहाय्य करणार आहे.
यापूर्वी ओरिसा राज्यात फोर्टिफाईड तांदूळ पुरवठ्याचा प्रयोग फायदेशिर ठरल्याने तो सर्वत्र लागू केला जात असल्याचे सांगण्यात आले. आता गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच १२ तालुक्यांना रेशन दुकानांमधून हा तांदूळ मिळणार आहे. तसेच गडचिरोलीत उत्पादित होणारा अतिरिक्त तांदूळ फोर्टिफाईड करून इतर कुपोषणग्रस्त जिल्ह्यांना पुरविला जाईल. त्यासंदर्भात जिल्ह्यातील राईस मिलर्सची एक कार्यशाळा नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

कसा असतो फोर्टीफाईड तांदूळ?
फोर्टीफाईड तांदूळ हा सामान्य तांदळाचे पीठ तयार करून त्यात व्हिटॅमिन डी, बी, लोह आणि फॉलिक अ‍ॅसिड आदी पोषक घटक मिसळविले जातात. त्यानंतर पुन्हा त्या पिठापासून तांदूळ बनविले जातात. हे तांदूळ सामान्य तांदळात १ टक्का (१०० किलोत १ किलो) या प्रमाणात मिसळवून तो पोषक तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमार्फत रेशन कार्डधारकांना पुरविला जातो.

पोषक तांदळाचा असा आहे फायदा
सदर फोर्टिफाईड तांदळात लोहघटक व इतर पोषकतत्व असल्यामुळे ते कुपोषित, रक्ताक्षयग्रस्त व सिकलसेल आदी रुग्णांसाठी फायदेशिर ठरणार आहे. तांदळाचे पीठ बनवून पुन्हा त्याचे तांदूळ बनविले जात असल्यामुळे सामान्य तांदळापेक्षा या तांदळाचा आकार थोडा मोठा असतो. ते लवकरच शिजतात आणि शिजल्यानंतर आकाराने आणखी मोठे होतात. सामान्य तांदळापेक्षा त्याची चवही थोडी वेगळी राहाते.

Web Title: Nutritional Rice to Provide Gadchiroli District to the Malnutrition-affected Districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न