विज्ञान प्रदर्शनातून नवीन संशोधनासाठी वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:36 PM2019-01-21T22:36:11+5:302019-01-21T22:36:29+5:30

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन लोकांचे जीवन सुखमय होण्यासाठी देशात नवीन संशोधन व्हावे, हा जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश असून हे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.

New research from science exhibition WAVE | विज्ञान प्रदर्शनातून नवीन संशोधनासाठी वाव

विज्ञान प्रदर्शनातून नवीन संशोधनासाठी वाव

Next
ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन थाटात, जिल्हाभरातील बाल वैज्ञानिक जमले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन लोकांचे जीवन सुखमय होण्यासाठी देशात नवीन संशोधन व्हावे, हा जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश असून हे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. डॉ.विक्रम साराभाई विज्ञाननगरी, शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून खा.नेते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर तर प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ.देवराव होळी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री, सहसचिव दादाजी चापले, सदस्य खुशाल वाघरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश उचे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.शरदचंद्र पाटील, उपशिक्षणाधिकारी तुषार आठवले, उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख, जि.प. सदस्य संपत आळे, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य घनशाम दिवटे आदी मंचावर उपस्थित होते.
सकारात्मक विचारातूनच यश प्राप्त होत असल्याने विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, आपला देश संशोधनामध्ये मागासलेला असून विद्यार्थ्यांनी संशोधन कार्यामध्ये विशेष रूची घेऊन नवनवीन संशोधन करावे, अशी अपेक्षा जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी व्यक्त केली. विद्यार्थी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगुनच देशाची प्रगती साधू शकतात. वैज्ञानिक दृष्टीकोन बालवयापासूनच रूजविण्याची गरज असून गडचिरोली जिल्ह्यात टॅलेंट हंट सुरू करणार असून विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये पाठविणार असल्याचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.राठोड यांनी भाषणातून सांगितले. कार्यक्रमाची सुरूवात संजय धात्रक व त्यांच्या चमूच्या स्वागतगीताने करण्यात आली. माध्यमिक शिक्षणाधिकारी उचे यांनी प्रास्ताविक मार्गदर्शनातून जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्दीष्ट स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन दिलीप उरकुडे यांनी तर आभार प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. शरदचंद्र पाटील यांनी मानले.

विज्ञान दिंडीने वेधले लक्ष
विज्ञान प्रदर्शनाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने गडचिरोली शहरातील मुख्य मार्गातून विज्ञान दिंडी काढण्यात आली. शिक्षणाधिकारी रमेश उचे यांनी हिरवी झेंडी दाखवून दिंडीचा शुभारंभ केला. विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक दिंडीत सहभागी झाले होते. यावेळी शिक्षण विभागाचे कर्मचारी साई कोंडावार, अमरदीप गेडाम यांच्यासह इतर कर्मचारी तसेच विविध शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: New research from science exhibition WAVE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.