A Naxalite killed in an encounter in the Aheri jungle | अहेरीतील जंगलात झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार

ठळक मुद्देसांड्रा परिसरात पोलीस-नक्षली आमनेसामनेदुसऱ्या घटनेत नक्षल साहित्य जप्त

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील सांड्रा जंगल परिसरात रविवारी सकाळी १०.३० वाजता पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत धानोरा तालुक्यातील लहान झेलिया जंगल परिसरात चकमकीनंतर घेतलेल्या शोधमोहिमेत नक्षलवाद्यांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
अहेरी तालुक्यातील उपपोलीस स्टेशन दामरंचाअंतर्गत येत असलेल्या छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील सांड्रा व जारागुडम जंगल परिसरात पोलिसांतर्फे नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला. या चकमकीत एक जहाल नक्षलवादी ठार झाला आहे. काही वेळानंतर नक्षलवाद्यांनी पळ काढला. घटनास्थळाचा शोध घेतला असता, एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्याकडे १२ बोअर रायफल आढळून आली. वृत्त लिहिपर्यंत मृत नक्षलवाद्याची ओळख पटली नव्हती.

लहान झेलिया जंगलातून भुसूरूंगाचे साहित्य जप्त
धानोरा तालुक्यातील कटेझरी परिसरातील लहान झेलिया जंगलात पोलिसांतर्फे नक्षलविरोधी मोहीम राबविली असताना रविवारी सकाळी १० वाजता चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव बघून नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळावर पोलिसांनी शोधमोहीम राबविली असता, त्या ठिकाणी डिटोनेटर, बॅटरीचे सेल, वायर असे भूसुरूंग स्फोट घडवून आणण्याचे साहित्य आढळून आले. हे सदर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.