उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:20 AM2018-06-25T00:20:17+5:302018-06-25T00:22:29+5:30

१३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ५० लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी वन विभाग व शासनाच्या इतर विभागांनी सुमारे ५५ लाख १६ हजार खड्डे खोदले आहेत.

More trees will be planted for the purpose | उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड होणार

उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड होणार

Next
ठळक मुद्दे५५ लाख खड्डे तयार : ५१ लाखांचे उद्दिष्ट, १ ते ३१ जुलै दरम्यान वृक्ष लागवडीसाठी वन विभाग सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ५० लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी वन विभाग व शासनाच्या इतर विभागांनी सुमारे ५५ लाख १६ हजार खड्डे खोदले आहेत. यावरून यावर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षांची लागवड होण्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
जागतिक तापमानातील वाढ, हवामान, ऋतू बदल यांची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. २०१६ मध्ये राज्यभरात २ कोटी व २०१७ मध्ये चार कोटीपेक्षा अधिक वृक्षांची लागवड झाली. तर २०१८ मध्ये १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यावर्षी राज्यभरात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वाढल्याने गडचिरोली जिल्ह्यालाही उद्दिष्ट वाढवून दिले आहे. यावर्षी ५० लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. वन विभाग व इतर विभागांनी सद्य:स्थितीत ५५ लाख १६ हजार १५४ खड्डे खोदले आहेत. याचबरोबर सामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत सुध्दा वृक्ष लागवड होणार आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीचा आकडा ६० लाखांच्या वर पोहोचण्याचा आशावाद वन विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. वृक्ष लागवडीसाठी आता सात दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने वन विभागाने वृक्ष लागवडीची तयारी सुरू केली आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जंगल जुने आहे. त्यातील काही वृक्ष वयोमानानुसार करपले आहेत. त्या ठिकाणी नवीन वृक्ष लागवड या उपक्रमांतर्गत केली जाणार आहे. वन विभागाकडे सर्वाधिक जमीन व यंत्रणा असल्याने वृक्ष लागवडीचे सर्वाधिक उद्दिष्ट वन विभागाला दिले आहे. त्याचबरोबर वृक्ष लागवडीचे नियोजन करण्याची जबाबदारी सुध्दा वन विभागाकडे सोपविली आहे. जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी वन विभागाच्या मार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
१ ते १० जुलैपर्यंत नागरिकांना रोपट्यांसाठी करता येईल नोंदणी
वृक्ष लागवड योजनेमध्ये नागरिकांचाही सहभाग वाढावा या उद्देशाने नागरिकांना सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी गडचिरोली शहरात तीन स्टॉल, देसाईगंज शहरात दोन स्टॉल व इतर तालुकास्तरावर एक स्टॉल लावला जाणार आहे. या स्टॉलला वनमहोत्सव केंद्र हे नाव दिले जाईल. एका व्यक्तीला जास्तीत जास्त पाच व संस्थेला २५ रोपटे दिले जातील. लहान पिशवीतील रोपटे ८ रूपयांना व मोठ्या पिशवीतील रोपटे ४० रूपयांना सवलतीत दिले जाणार आहे. शोभीवंत झाडे, फळझाडे व सावली देणारी झाडे केंद्रावर उपलब्ध राहतील. १ ते १० जून या कालावधीत वृक्षांची नोंदणी करता येईल. ज्या दिवशी नोंदणी होईल, त्याच दिवशी संबंधित व्यक्तीला वन विभागाच्या वाहनामार्फत वृक्ष घरी पोहोचता करून दिले जातील. जास्तीत जास्त नागरिकांनी वृक्षांच्या मागणीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विभागनिहाय खड्ड्यांची संख्या
पावसाळ्यानंतर खड्डे खोदण्याच्या कामाला गती आली. शनिवारपर्यंत जिल्हाभरात ५५ लाख १६ हजार १५४ खड्डे खोदले आहेत. यामध्ये वन विभागाने ३३ लाख, एफडीसीएम १४ लाख ८ हजार, एसएफडी २ लाख ६० हजार, ग्रामपंचायत ४ लाख ८१ हजार, कृषी विभाग २४ हजार, शिक्षण ५३ हजार, उच्च व तंत्र शिक्षण ३८०, नगर विकास विभाग २ हजार ६५, सार्वजनिक बांधकाम विभाग ६ हजार ७१५, ग्राम विकास विभाग २ हजार ५२४, पोलीस विभाग ३ हजार ७५५, आदिवासी विकास विभाग १२ हजार ४७०, ऊर्जा २३०, परिवहन ५००, आरोग्य ७१५, जलसंपदा १ हजार ३४४, सहकार पणन व विपणन विभाग २ हजार ३६०, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग २१५, कारागृह १००, कौशल्य उद्योजकता विभाग ३५०, महसूल ५४४, महिला व बाल कल्याण विभागाने ४ हजार १९ खड्डे खोदले आहेत. हे आकडे केवळ शासकीय विभागांचे आहेत. सामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्थांना सवलतीच्या दरात वृक्ष उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीचा आकडा ६० लाखांच्या वर पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: More trees will be planted for the purpose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.