'Missed Call' campaign for anti-Naxal campaign, Bhakmala Sanghatana initiative | नक्षलविरोधी मोहिमेसाठी ‘मिस्ड कॉल’ अभियान, भूमकाल संघटनेचा उपक्रम

गडचिरोली : भूमकाल संघटनेने नक्षलविरोेधी मोहीम तीव्र करण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ८४१२९८८८४४ हा मोबाइल क्रमांक उपलब्ध केला आहे. मिस्ड कॉल दिलेल्या व्यक्तीसोबत संपर्क साधून नक्षलविरोधी अभियानासाठी त्यांची मदत घेण्याची अनोखी योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरविंद सोवनी, सचिव प्रा.श्रीकांत भोवते, सदस्य अविनाश सोवनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, सध्या नक्षलवाद्यांनी ‘एकाला मारा आणि एक लाख लोकांमध्ये दहशत ठेवा,’ असा दुर्दैवी उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या
आठ दिवसांपासून नक्षल्यांनी सामान्य नागरिकांच्या हत्येचे सत्र सुरू
केले आहे. नागरिकांमध्ये नक्षलवाद्यांविषयी चीड व तिरस्कार असला, तरी भीतीमुळे ते उघडपणे बोलू शकत नाहीत. त्यामुळे जनता
आपल्या पाठिशी आहे, असा तोरा नक्षलवादी मिरवित आहेत. त्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी सामान्य नागरिकांनी नक्षलवाद्यांविरोधात उभे होणे गरजेचे आहे.

असे आहे अभियान
मिस्ड कॉल दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला एक मिनिटाच्या आत फोन येईल. या फोनवरून नक्षलविरोधी अभियानाची ध्वनिफीत ऐकविली जाईल. त्यानंतर, संघटनेचे सदस्य, प्रतिनिधी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून तिच्या अडचणी जाणून घेतील.