गडचिरोलीच्या मातीत साकारणार मराठी चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:21 AM2018-06-07T01:21:18+5:302018-06-07T01:21:18+5:30

झाडीपट्टीतील कलाकारांना प्रकाशझोतात आणण्यासाठी, त्यांच्यातील कला कौशल्यांना रूपेरी पडद्यावर झळकण्याची संधी देण्यासाठी गडचिरोलीच्या मातीत ‘घाव एक प्रतिघात’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून या चित्रपटाचे चित्रीकरण गडचिरोली जिल्ह्यातच होणार आहे.

 Marathi film will prove true in Gadchiroli soil | गडचिरोलीच्या मातीत साकारणार मराठी चित्रपट

गडचिरोलीच्या मातीत साकारणार मराठी चित्रपट

Next
ठळक मुद्दे१५ पासून चित्रीकरण : झाडीपट्टीच्या स्थानिक कलावंतांना संधी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : झाडीपट्टीतील कलाकारांना प्रकाशझोतात आणण्यासाठी, त्यांच्यातील कला कौशल्यांना रूपेरी पडद्यावर झळकण्याची संधी देण्यासाठी गडचिरोलीच्या मातीत ‘घाव एक प्रतिघात’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून या चित्रपटाचे चित्रीकरण गडचिरोली जिल्ह्यातच होणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ येत्या १५ जून रोजी करण्यात येत असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते नितीन पत्रुजी धानोरकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रमोद रेनगडे, निर्मात्या सरला दिलीप इंगळे, डॉ. दिनकर रामटेके, बबन दुर्गे, सोनिया काटकर, कलावंत विप्लव इंगळे, रोहिनी दिनकर रामटेके, रोमित उंदीरवाडे आदी उपस्थित होते.
माहिती देताना धानोरकर म्हणाले, ‘घाव’ या चित्रपटाचे कथानक शेतकरी आणि त्याच्या परिवाराच्या जीवनावर आधारित आहे. अवैध सावकारी, नापिकी, कर्जबाजारीपणा आदींशी सामना करताना विदर्भातील शेतकरी कशा रितीने हालअपेष्टा सहन करीत आहे. याचे वर्णन या चित्रपटातून केले जाणार आहे.
विदर्भाच्या मातीशी नाळ जुळणारा चित्रपट असल्याने जिल्ह्यातील वाकडी, मार्र्कंडादेव तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये चित्रीकरण करण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी ५० लाख रुपये इतका खर्च येणार आहे. चित्रपट २ तास १० मिनीटे राहील. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुणे, मुंबई तसेच इतर राज्यातील तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. चित्रपटात एकूण १२ ते १७ कलावंत असून स्थानिक कलावंतांना प्राधान्य देण्यात आले आहे.
मुख्य कलावंतांची कौटुंबिक पार्श्वभूमी
चित्रपटात विप्लव इंगळे हा मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत असून रोहिनी दिनकर रामटेके ही मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. विप्लव इंगळे हा मूळचा वर्धा येथील आहे. सध्या तो पुणे येथील डी.वाय. पाटील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तर रोहिनी ही गडचिरोली येथील असून कुरखेडा येथील कुथे पाटील महाविद्यालयातून नुकतीच १२ वी उत्तीर्ण झालेली आहे. चित्रपटाचे निर्माते नितीन धानोरकर हे स्वत: चित्रपटात भूमिका साकारत आहेत. रोमित उंदीरवाडे हे या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहेत तर गडचिरोली येथे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असलेले होमदेव कोसमशिले यांचीसुध्दा चित्रपटात महत्वाची भूमिका असणार आहे.

Web Title:  Marathi film will prove true in Gadchiroli soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा