लोह प्रकल्पातून स्थानिकांनाच रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:06 AM2018-04-16T01:06:53+5:302018-04-16T01:06:53+5:30

खनिज संपत्तीने परिपूर्ण असलेल्या या जिल्ह्यातील खनिज संपत्ती जिल्ह्याबाहेर जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. पण आता कोनसरी येथील लॉयड्स मेटल कंपनीच्या प्रकल्प उभारणीसाठी जमीन हस्तांतरित झाल्याने एक महत्वाचा टप्पा पूर्ण केला आहे.

Local employments from the Iron project | लोह प्रकल्पातून स्थानिकांनाच रोजगार

लोह प्रकल्पातून स्थानिकांनाच रोजगार

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची ग्वाही : कोनसरी प्रकल्पग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खनिज संपत्तीने परिपूर्ण असलेल्या या जिल्ह्यातील खनिज संपत्ती जिल्ह्याबाहेर जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. पण आता कोनसरी येथील लॉयड्स मेटल कंपनीच्या प्रकल्प उभारणीसाठी जमीन हस्तांतरित झाल्याने एक महत्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीनंतर जिल्ह्याची खनिज संपत्ती बाहेर जाणार नाही. या लोहखनिज प्रकल्पात जिल्हावासियांनाच रोजगार मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे जाहीर भाषणातून दिली.
जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण आणि सुसज्ज जिल्हा नियोजन सभागृहाचे उद्घाटन केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, खासदार अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता पिपरे, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, लॉयड्स मेटल अ‍ॅन्ड एनर्जी लि.चे चेअरमन अतुल खाडीलकर, राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त अनुपकुमार, पोलीस महानिरीक्षक शरद शेलार, जिल्हाधिकारी शेखर सिंग, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, मुख्य वनसंरक्षक डब्लू.एटबॉन, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूरसिंग तिडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर आदी मंचावर विराजमान होते.
कोनसरी प्रकल्पामुळे जिल्ह्यात आणखी गुंतवणूक वाढेल, इतर उद्योगही जिल्ह्यात येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात विविध विकासात्मक कामे हाती घेतली. सिंचन विहीरी, शेततळी यांची कामे भरपूर झाल्याचे सांगत त्यांनी अधिकारीवर्गाची पाठ थोपटली. याशिवाय जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याने जिल्हावासियांचे आरोग्य चांगले राहीले, असे ते म्हणाले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून २ लाखापर्यंतचे आॅपरेशन मोफत केले जाते. मात्र आता केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेतून ५ लाखापर्यंतचा आॅपरेशनचा खर्च शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत म्हणाले, नवीन रुग्णालयाच्या लोकार्पणामुळे बाळंतपणासाठी कोणत्याही महिलेला आता बाहेरगावी जावे लागणार नाही. या ठिकाणच्या नर्सिंग स्टाफचे कौतुक करून एक शववाहिनी या जिल्ह्यासाठी घेण्याची परवानगी आरोग्य विभागाला द्यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या भाषणात केली. शिवाय चामोर्शीतील रुग्णालयाच्या विस्तारीकरणावर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिली.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी शिर्डीच्या साई संस्थानकडून महिला रुग्णालयासाठी गडचिरोलीसाठी एमआरआय मशिन मिळणार असल्याचे सांगितले. तर आ.डॉ.होळी यांनी चामोर्शी व धानोरा येथील रुग्णालयांचा विस्तार करून तिथे १०० खाटाचे रुग्णालय करावे अशी मागणी केली. याशिवाय जिल्ह्यातील १९८० पूर्वीची मान्यता असलेले पण वनकायद्यात अडकलेले ३ प्रकल्प नव्याने मंजूर करून द्यावे अशी मागणी केली.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी अनेक अडचणींवर मात करीत जिल्ह्यात होत असलेल्या सकारात्मक कामांची माहिती मांडली. या जिल्ह्याची मागास जिल्हा ही प्रतिमा पुसून टाकण्यासाठी सर्वांना हातभार लावावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव व प्रभाकर कुबडे यांनी तर आभार प्रदर्शन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूढे यांनी केले.
-अन् कर्मचारी सभेतून उठले
मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरूवात करताच कार्यक्रमाला उपस्थित एनआरएचएम कर्मचारी त्यांच्या मागण्यांचे निवेदन थेट मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना देण्यासाठी अचानक बाहेर जाऊ लागले. त्यामुळे काय गडबड झाली? असा प्रश्न मंचावरील नेत्यांसह साऱ्यांना पडला होता.
अभियंते व कंत्राटदारांचा सत्कार
सुसज्ज अशा नियोजन सभागृहाचे उत्कृष्ट बांधकाम आणि सजावट केल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अधीक्षक अभियंता प्रदीप खवले, कार्यकारी अभियंता पी.एन.बूब व इतर अभियंत्यांसह मे.विजयानंद बोअरवेल्सचे संचालक आनंद श्रृंगारपवार, अंतर्गत सजाव फर्निचर व्यवस्थेसाठी कंत्राटदार मे.ओंकार कन्स्ट्रक्शन पुणेचे संचालक आदींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अनुपकुमार समितीच्या शिफारसीनुसार कठीण भाग भत्ता
इतर विभागांप्रमाणे आरोग्य कर्मचाºयांना कठीण भागासाठीचा भत्ता मिळावा अशी मागणी समोर आली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेल्या अहवालातील शिफारसीनुसार कठीण भाग भत्ता दिला जाईल, असे सांगितले. विशेष म्हणजे त्या अहवालातील शिफारसी काय आहेत यावरील दोन बातम्या ‘लोकमत’ने गेल्या २७ व ३० मार्च रोजी प्रसिद्ध केल्या आहेत.
बांधकामातील त्रुटींमुळे लोकार्पणास विलंब
महिला व बाल रुग्णालयाच्या बांधकामात अनेक त्रुटी होत्या. यापूर्वी दोन वेळा त्या रुग्णालयाला आपण भेट दिल्यानंतर त्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे रुग्णालयाच्या लोकार्पणासाठी एक वर्ष वाट पहावी लागली, असे आरोग्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
बाईक अ‍ॅम्बुलन्स, टेलिमेडिसीन सेवा मिळावी
यावेळी आपल्या भाषणात पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम रुग्णालयाचे लोकार्पण केवळ लोकार्पण करून चालणार नाही तर त्या ठिकाणी चांगली सेवा देण्याची जबाबदारी आता आरोग्य प्रशासनाची आहे. दुर्गभ भागातील अनेक गावांत अ‍ॅम्बलन्स जाऊ शकत नाही. त्यासाठी बाईक अ‍ॅम्बुलन्स, तसेच आधुनिक तंत्राचा वापर करीत टेलिमेडीसीनच्या माध्यमातून मोठ्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्थानिक रुग्णांवर उपचार अशा सुविधा जिल्ह्यासाठी द्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून व्यक्त केली.

Web Title: Local employments from the Iron project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.