With the influence of pesticides 250 goats killed | कीटकनाशकांच्या प्रभावाने २५० शेळ्या ठार

ठळक मुद्देपशुपालक धास्तावले : बामणी व चेरपल्लीत तेलंगणातील शेतकºयांनी केली होती फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या बामणी व चेरपल्ली या गावातील पशुपालकांच्या अडीचशेपेक्षा जास्त बकऱ्या मागील आठ दिवसांत अचानकपणे मृत्यूमुखी पडल्या आहेत. कापसावर व इतर पिकांवर होत असलेल्या कीटकनाशकांच्या फवारणीमुळे बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या असल्याची माहिती गावकºयांनी दिली आहे.
तेलंगणा राज्यातील काही नागरिकांनी बामणी व चेरपल्ली येथील शेतकऱ्यांची ५०० एकरपेक्षा अधिक जमीन भाड्याने घेतली आहे. या जमिनीवर त्यांनी कापूस व इतर पिकांची लागवड केली आहे. रोगांच्या प्रादुर्भावापासून पिकाला वाचविण्यासाठी तेलंगणातील शेतकरी अत्यंत जहाल कीटकनाशके फवारत आहेत. त्या शेताजवळच्या झाडांचा पाला खाल्यांमुळे बामणी व चेरपल्ली येथील पशुपालकांच्या ३०० हून अधिक बकऱ्या मागील आठ दिवसांत मृत्यूमुखी पडल्या आहेत.
बामणी येथील दुर्गय्या गोसाई कुमरम यांच्या सुमारे १५० बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या. याच गावातील आमरय्या कुमरम यांच्या २० बकऱ्या, मनोहर झाडे यांच्या १६ बकºया, नंदू सिडाम यांच्या १० बकºया, कुमरय्या चौधरी यांच्या २६ बकºया, साईनाथ सिडाम यांच्या सात बकऱ्या, वासुदेव आत्राम यांच्या मालकीच्या १० बकऱ्या, लक्ष्मण पेंदाम यांच्या १० व सुरेश पेंदाम यांच्या दोन बकऱ्या अशा एकूण जवळपास अडीचशे बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. त्यामुळे या पशुपालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तेलंगणा राज्यातील गुंटूर येथील पी.व्यंकटरमन्ना, धनापती कट्टा व इतर चार शेतकऱ्यांनी बामणी व चेरपल्ली येथील ५०० एकरपेक्षा अधिक शेती केली आहे. या शेतकऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, हे शेतकरी जे कीटकनाशक फवारत आहेत, त्याची चौकशी करावी, त्याचबरोबर संबंधित शेतकºयांवर दंड ठोठावून दंडाची रक्कम शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी गावातील पशुपालकांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच अहेरी नगर पंचायतीचे सभापती नारायण सिडाम, नगरसेवक संजय झाडे, सामाजिक कार्यकर्ते रिजवान शेख यांनी गावात जाऊन पशुपालकांची भेट घेतली. यावेळी घडलेला प्रसंग डोळ्यात अश्रू ढाळत शेतकरी सांगत होते.
कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांना सुटते खाज
कापूस वेचण्यासाठी ज्या महिला जात आहेत, त्यांच्या अंगाला खाज सुटत आहे. चेहऱ्यावर सूज येत आहे. वृद्ध महिला मजुरांना गुडघा व हातपाय दुखण्याचा त्रास होत आहे. झाडाची पाने खाऊन आलेल्या बकरीचे लहान पिल्लू सुद्धा दूध पिल्यानंतर मरण पावत आहेत. यावरून कीटकनाशकांची तीव्रता किती भयानक असल्याचे दिसून येते.


Web Title: With the influence of pesticides 250 goats killed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.