Increase the speed of development work | विकास कामांची गती वाढवा

ठळक मुद्देआमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना : पं.स.च्या आमसभेत योजना व विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून प्रशासनाने अर्थातच अधिकाºयांनी विकासकामाची गती वाढवावी, अशा सूचना आ.कृष्णा गजबे यांनी केल्या.
शुक्रवारी २९ जून रोजी स्थानिक किसान सभागृहात आयोजित कुरखेडा पंचायत समितीची आमसभा आ.गजबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना गजबे बोलत होते. पुढे बोलताना गजबे यांनी जलयुक्त शिवार या मुख्यमंत्र्याच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामाचे नियोजन करावे तसेच कामाच्या ठिकाणी संबंधित एजन्सी व कामावर झालेला एकूण खर्च दर्शविणारा फलक लावावा, असे निर्देश दिले.
याप्रसंगी मंचावर उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार अजय चरडे, संवर्ग विकास अधिकारी पी.एल.मरसकोल्हे, नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, पंचायत समितीचे सभापती गिरीधारी तितराम, उपसभापती मनोज दुणेदार, भाजपचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हासचिव विलास गावंडे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जीवन नाट, जि.प.सदस्य नाजूक पुराम, भाग्यवान टेकाम, प्रभाकर तुलावी, गीता कुमरे, प्रल्हाद कराडे, पं.स.सदस्य श्रीराम दुगा, वर्षा कोकोडे, शारदा पोरेटी, संध्या नैताम, सुनंदा हलामी, कविता गुरनुले, माधुरी मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाल विकास प्रकल्प, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, जि.प.बांधकाम, सिंचाई विभाग, सार्वजनिक बांधकाम, वन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आदी बाबतच्या कामांचा आढावा आ.गजबे यांनी घेतला.
विद्युत विभागाच्या मागील वर्षीच्या आमसभेच्या अनुपालन अहवालावरील चर्चे दरम्यान माजी जि.प.सदस्य तथा आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे यांनी अधिकाºयांवर कामचुकारपणा व भ्रष्टाचाराचे आरोप करून चौकशीची मागणी लावून धरली. पंचायत विस्तार अधिकारी सत्यवान वाघाडे यांनी अहवाल वाचन केले. सभेचे संचालन पंचायत विस्तार अधिकारी राऊत यांनी तर आभार विस्तार अधिकारी पारधी यांनी मानले. या आमसभेला तालुक्यातील संबधित विभागाचे विभाग प्रमुख, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, माजी लोकप्रतिनिधी व ग्रामसभा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समस्यांवरही चर्चा
कुरखेडा तालुक्याच्या अनेक गावांमध्ये शाळा, अंगणवाडी, रस्ते, नाल्या, पाणी योजना, घरकूल, शौचालय व नरेगाच्या कामाबाबत अनेक समस्या आहेत. या समस्यांवर सदर सभेत चर्चा करण्यात आली. अनेकांनी समस्याही मांडल्या.


Web Title: Increase the speed of development work
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.