बियाणे बदलाचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:59 AM2018-05-23T00:59:41+5:302018-05-23T00:59:41+5:30

दरवर्षी बियाणांचे नवीन वाण बाजारात उपलब्ध होतात. या वाणाच्या लागवडीमुळे उत्पादनात भर पडेल, असे आश्वासन बियाणे निर्मिती कंपन्यांकडून केली जात असल्याने बियाणे बदलविण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले असल्याचे दिसून येते.

Increase in seed yield | बियाणे बदलाचे प्रमाण वाढले

बियाणे बदलाचे प्रमाण वाढले

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पादनात होते वाढ : गरजेनुसार उपलब्ध करून द्यावे लागतात बियाणे

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दरवर्षी बियाणांचे नवीन वाण बाजारात उपलब्ध होतात. या वाणाच्या लागवडीमुळे उत्पादनात भर पडेल, असे आश्वासन बियाणे निर्मिती कंपन्यांकडून केली जात असल्याने बियाणे बदलविण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले असल्याचे दिसून येते.
गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान, सोयाबिन, तूर, कापूस, मका, उडीद, तीळ आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. यातील धानपिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्याचबरोबर धानाचे दरवर्षी नवीन वाण बाजारात येते. या नवीन वाणाची उत्पादन क्षमता अधिक आहे. त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता जास्त असून उत्पादनाचा दर्जा चांगला असल्याने संबंधित धानाला चांगला भाव मिळते, अशी जाहिरात कंपन्यांच्या वतीने केली जाते. यातील काही वाण निश्चितच चांगले राहतात. उत्पादनात वाढ होईल, या अपेक्षेने शेतकरी नवीन वाण खरेदी करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे बियाणे कंपन्यांची चांदी होते. हीच बाब कापूस पिकासाठी लागू होते. दरवर्षी अनेक कापूस कंपन्या बियाणे विक्रीसाठी पुढे येतात व जाहिरात करतात.
उडीद, तीळ या पिकांमध्ये अत्यंत कमी प्रमाणात संशोधन असल्याने बाजारात या पिकांचे नवीन वाण सहजासहजी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे शेतकरी त्यांच्याकडे असलेले जुने बियाणेच वापरतात.
कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार २०१७ मधील खरीप हंगामात २५ टक्के बियाणे नवीन खरेदी केले. ७४ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबिनचे बियाणे बदलविले. ७.५२ टक्के तुरीचे बियाणे बदलले. कापूस १०० टक्के, मक्का १.७१ टक्के बियाणे बदलविले आहेत. २०१८ मध्ये हे प्रमाण वाढून ३३.३७ टक्के धान, ८० टक्के सोयाबिन, ३० टक्के तूर, १०० टक्के कापूस पिकाचे बियाणे बदलविले जाणार आहेत.
बियाणे बदलविण्याचे प्रमाण वाढल्यानंतर तेवढे बियाणे बाजारात उपलब्ध करून द्यावी लागतात. अन्यथा बियाणांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांना अधिकची किंमत मोजावी लागते. त्यामुळे दरवर्षी कृषी विभाग किती बियाणे बदलविले जातील, याचा अंदाज घेत राहते.
बियाणे कंपन्या चांगल्या दर्जाचे बियाणे सीलबंद करून बाजारात उपलब्ध करतात. त्यामुळे शेतकऱ्याला वर्षभर बियाणे ठेवावे लागत नाही. त्याचबरोबर चांगल्या दर्जाचे बियाणे राहत असल्याने त्यांची उगवण क्षमता अधिक राहते. त्यामुळे उत्पादन वाढत असल्याने शेतकरी दोन पैसे अधिक गेले तरी कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यास पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.
कृषी विभागाकडून बियाण्यांवर प्रक्रियेचे प्रशिक्षण
कंपन्यांचे बियाणे बाजारात उपलब्ध असले तरी या बियाणांची किंमत अधिक राहत असल्याने सर्वसाधरण शेतकºयाला हे बियाणे परवडत नाही. त्याचबरोबर मोठा शेतकरी असला तरी सर्वच नवीन बियाणे खरेदी करणे त्याला सुद्धाही शक्य होत नाही. मागील काही वर्षांपासून कृषी विभाग शेतकऱ्यांना बियाणांवर कशी प्रक्रिया करावी, जेणे करून बियाणांची उगवण क्षमता वाढण्यास मदत होईल, याबाबतचे प्रशिक्षण गावपातळीवर जाऊन केले जात आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार बियाणे तयार केल्याने उगवण क्षमता वाढल्याचा अनुभव शेतकºयांना येत असल्याने काही शेतकरी स्वत:च घरच्या बियाणांवर प्रक्रिया करून त्यांची पेरणी करीत आहेत. विशेष करून धानपिकाबाबत या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यास फार मोठी मदत होत आहे. बियाणे निर्मितीच्या प्रशिक्षणांमध्ये कृषी विभागाने वाढ केल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल.

Web Title: Increase in seed yield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी