स्वागतार्ह ! गडचिरोलीतील विसोराचा मोहर्रम देतोय हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:31 PM2018-09-19T22:31:57+5:302018-09-20T10:13:30+5:30

भारत देशात विविध धर्म असले तरी आपण धर्मनिरपक्षेतेचे तत्त्व अंगिकारले आहे. प्रत्येक धर्म आपणाला माणुसकीचे शिक्षण देत असते. विसोरा येथील हिंदू समाज बांधवही अगदी आनंदाने मोहरमच्या उत्सवात सहभागी होतात.

Hindu-Muslim unity message is given by Vishor Moharram | स्वागतार्ह ! गडचिरोलीतील विसोराचा मोहर्रम देतोय हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

स्वागतार्ह ! गडचिरोलीतील विसोराचा मोहर्रम देतोय हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

Next
ठळक मुद्देआजही जपली जातेय शतकोत्तरी परंपरा : गावातून निघतो सवारीचा जुलूस, मुस्लिमांसह हिंदूंचाही सहभाग

अतुल बुराडे/विलास चिलबुले।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा/आरमोरी : : भारत देशात विविध धर्म असले तरी आपण धर्मनिरपक्षेतेचे तत्त्व अंगिकारले आहे. प्रत्येक धर्म आपणाला माणुसकीचे शिक्षण देत असते. याच माणुसकीच्या ओलाव्यातून बलिदानाचे प्रतिक असलेला मोहर्रम हा मुस्लिम बांधवांचा उत्सव आहे. विसोरा येथील हिंदू समाज बांधवही अगदी आनंदाने मोहरमच्या उत्सवात सहभागी होतात. विसोरा येथील मोहरम उत्सवाला शतकोत्तर वर्षांची परंपरा लाभली असून हा उत्सव हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश आजही देतो.
देसाईगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे विसोरा हे गाव ४ हजार ६०४ लोकसंख्येचे मोठे गाव आहे. एकूण १ हजार १२४ कुटुंब असलेल्या या गावात मुस्लिम समाजाची अवघी चार कुटुंब आहेत. ज्यांची एकूण लोकसंख्या केवळ १३ आहे. मुस्लिम बांधवांचे प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम यांनी दिलेल्या बलिदानप्रति हा दिवस पाळला जातो. हजरत इमाम यांनी सत्य, सदाचार आणि न्यायासाठी करबाला येथे आपले जीवन समर्पित केले. यानिमित्त ताजिया मिरवणूक आयोजित केली जाते. बलिदान देणाऱ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ धार्मिक सभा आयोजित केल्या जातात.
तब्बल १० दिवस मोहर्रम उत्सव साजरा केला जातो. १० दिवसांपूर्वी चंद्रदर्शन झाल्यावर या सणाला सुरुवात होते. पाचव्या दिवशी सवारीची स्थापना, सातव्या दिवशी संदल म्हणजे पूजा केली जाते. नवमीला गावातून वाजतगाजत सवारीचा जुलूस निघतो. यावेळी चौकात सरबत वाटप केले जाते आणि शेवटच्या म्हणजे दहाव्या दिवशी मोहरमला पुन्हा वाजतगाजत सवारीचा जुलूस आणि ताजीया मिरवणूक काढली जाते. अखेर गावतलावात हा ताजिया (डोल) विसर्जित केला जातो. ताजिया मिरवणुकीत गावातील अनेक जाती, धर्माचे लोक सहभागी होतात. ताजिया मिरवणूक पाहण्यासाठी गावातील अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा महिला व पुरुष गर्दी करीत असतात. ताजिया ज्याला डोल म्हणतात जो बांबूच्या कांबीपासून बनविलेला षटकोनी मंडप असतो. ज्यावर रंगीबेरंगी कागद, प्लास्टिक लावून हाताने सजविले जाते. सध्या विसोराचे हुसैन शेख ताजिया बनवितात. ताजिया तयार करण्यासाठी हुसैन शेख यांना त्यांचे शेजारी हिंदूबांधव अगदी मनोभावे मदत करतात.मोहर्रम हा सण मुस्लिम समाजाचा असला तरी विसोरा येथील हिंदू समाज मुस्लिम बांधवांशी मागील अनेक पिढ्यांपासून एकत्रित हा उत्सव साजरा करतात. पहिल्या ते अखेरच्या दिवसापर्यंत हिंदू-मुस्लीम लोक अगदी सहजतेने उत्साहात सहकार्य देऊन शंभरावर वर्षांपूर्वी पासून विसोरास्थित मुस्लिम व हिंदू जनता मोहर्रम उत्सव साजरा करतात. या उत्सवातून आजच्या एकविसाव्या शतकात सर्वधर्मसमभावाची शिकवण देत आहेत, असे म्हणण्यास काही हरकत नाही.
अशी आहे मोहर्रम उत्सवाची पार्श्वभूमी
इराकची राजधानी बगदादपासून १०० किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे तारीख-ए-इस्लामचे एक ऐतिहासिक युध्द झाले. त्याने इस्लाम धर्माचा चेहरामोहराच बदलून टाकला. या करबला गावामुळेच जगातील प्रत्येक शहरात ‘करबला’ नावाचे पवित्र स्थान उभारण्यात आले आहे. या ठिकाणी मोहर्रम साजरा केला जातो. हिजरी संवतच्या पहिल्या महिन्यात मोहरमची १० तारखेला (१० मुहर्रम ६१ हिजरी, अर्थात १० आॅक्टोबर, ६८०) मध्ये मोहम्मद यांचे नातू हजरत हुसैन यांना करबला येथे खलिफा यजीद बिन मुआविया यांच्या साथीदारानी ज्या दिवशी मारून टाकले होते, तो दिवस म्हणजे ‘यौमे आशुरा’ होय. याच दिवशी दु:खाचा दिवस म्हणून मुस्लिम बांधव मोहर्रम साजरा करतात.
यजिदने समाजाविरूध्द बंड करून इतर नागरिकांसोबत त्याने हजरत हुसैन यांनी त्याला खलिदा पदासाठी मान्य करण्यासाठी दम दिला. इमाम हुसैन यांनी यजीदला खलिदा म्हणून मान्य न केल्याने करबला या गावावर युद्धाचे ढग गोळा झाले. त्यानंतर युध्द झाल्याने हुसैन शहीद झाले. त्यामुळेच हजरत हुसैन यांना ‘शहीद-ए-आजम’ म्हटले जाते. हजरत हुसैन यांनी मुठभर नागरिकांच्या मदतीने त्या काळच्या जाचक हुकूमशाहीविरूद्ध कंबर कसली होती. हुसैन यांनी केलेले महान कार्य आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. हजरत हुसैन यांच्या स्मरणार्थ मोहर्रम साजरा केला जातो. तसे पाहिले तर हा काही उत्सव नसून दु:खाचा दिवस आहे. हजरत हुसैन यांचे आंदोलन असा संदेश देते की, प्रत्येक नागरिकाने सत्याच्या मार्गाने गेले पाहिजे.

आमच्या पूर्वजांनी माणल्याप्रमाणे आम्ही आजही मोहरम हा सण मुस्लिम बांधवांशी मिळूनमिसळून साजरा करीत आहोत. यापुढेही उत्सवाची ही परंपरा अशीच चालू राहील, याचा मला विश्वास आहे.
- हिरालाल अवसरे, माजी सरपंच, ग्रा.पं.विसोरा

Web Title: Hindu-Muslim unity message is given by Vishor Moharram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.