- गोपाल लाजूरकर  
गडचिरोली -  रामायणकाळातील राजा रावणाची विविध इष्ट-अनिष्ट रूपे सर्वज्ञात आहेत. या रूपानुसार प्रत्येकाच्या मनात राजा रावणाविषयी वेगवेगळ्या प्रतिमा तयार झाल्या आहेत. अयोध्येचे राजपुत्र राम यांची पत्नी सीतेचे हरण करणारा लंकेचा राजा रावण हा वाईट प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून विजयादशमीच्या दिवशी त्याच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा सर्वत्र आहे. मात्र दुसरीकडे राजा रावणाच्या शौर्याची गाथा गाऊन पूजन करण्याची परंपरा गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांत जोपासली जाते. विजयादशमीला मोठय़ा आदरभावाने या गावांमध्ये आदिवासी बांधव रावण महोत्सव साजरा करतात.
जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील परसवाडी (दुधमाळा), धानोरा, कन्हाळगाव, रांगी, येरकडटोला, महावाडा, आरमोरी तालुक्यातील वानरचुवा, गडचिरोली तालुक्यातील चांदाळा, अहेरी तालुक्यातील कमलापूर, कोसेगुडम, मेडपल्ली, कुरखेडा तालुक्यातील मालदुगी तसेच कोरची आदी प्रमुख गावांसह इतर काही लहान गावांमध्ये विजयादशमीच्या दिवशी रावण महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी आदिवासी बांधव राजा रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर प्रतिष्ठापणा करून पारंपरिक पूजा केली जाते. विशेष म्हणजे याप्रसंगी अर्जी म्हणजेच प्रार्थना केली जाते. आदिवासींचा राजा रावण हा भाव मनात ठेवून पारंपरिक गीतांमधूनही राजा रावणाच्या शूरतेचा व पराक्रमाचा गुणगौरव केला जातो.

गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव मंदिर
राजा रावणाप्रती आदिवासी बांधवांची अपार ङ्म्रद्धा आहे. या ङ्म्रद्धेतूनच धानोरा तालुक्यातील परसवाडी (दुधमाळा) येथे 1991 मध्ये राजा रावणाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या गावात दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी रावण महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात शरणपथ, कर्नाटक राज्यातील हम्पी विद्यापीठात रावणाची मूर्ती आहे. तसेच मध्यप्रदेशातील मंदसौर येथे राजा रावणाचे मंदिर आहे. या मंदिरातील राजा रावणाच्या मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता यावे याकरिता विजयादशमीच्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडले जातात. विशेष म्हणजे, राजा रावणाचा व अनिष्ट प्रवृत्तींचा धिक्कार विजयादशमीच्या दिवशी केला जात असला तरी दक्षिण भारतात तामिळनाडू राज्यात रावणाचे 352 मंदिर आहेत, असे आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक सांगतात.

आदिवासींचा समज व धारणा
राजा रावण शूर-पराक्रमी, संगीत पारंगत, विद्वान न्यायनिष्ट राजा होता. आदिवासी साहित्यात त्याला पूजनीय स्थान आहे. या स्थानामुळेच राजा रावणाला आदिवासी आपले दैवत मानतात. परंतु वैदिक साहित्यात रावणाच्या महिमेचे विदृपीकरण केले असल्याने समाजात राजा रावणाबद्दल अनिष्ट संदेश गेला, असल्याचे आदिवासी साहित्यिक नंदकिशोर नैताम यांचे म्हणणो आहे. दुष्ट अथवा अनिष्ट हे प्रतिक राजा रावणाच्या महिमेवर भारी पडले. असे असले तरी शूर, पराक्रमाचे प्रेरणास्थान या रुपाने आदिवासी राजा रावणाला आपले दैवत मानतात असे त्यांनी सांगितले.

आज लाकडी मूर्तीची होणार स्थापना
कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथे यंदाच्या रावण महोत्सवात 3क् सप्टेंबरला होणार आहे. यंदा प्रथमच राजा रावणाची प्रतिमा लाकडावर कोरून सदर मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. पहांदीपारी कुपार लिंगो गोंडी धर्म महासंघ शाखा मालदुगीच्या वतीने लाकडी मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे.