येथे किराणा दुकान अन् पानठेल्यांवर विकले जाते पेट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:29 PM2018-09-21T12:29:45+5:302018-09-21T12:29:54+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात पेट्रोल किंवा डिझेलची खुलेआम विक्री चक्क किराणा दुकान आणि पानठेल्यांमधून होत असताना कुणावरही कारवाई होत नाही.

Here petrol is sold at grocery store and pan shops | येथे किराणा दुकान अन् पानठेल्यांवर विकले जाते पेट्रोल

येथे किराणा दुकान अन् पानठेल्यांवर विकले जाते पेट्रोल

Next
ठळक मुद्देपेट्रोल पंपच नसलेल्या एकमेव मुलचेरा तालुक्यात अशीही सोय

मनोज ताजने।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अतिज्वलनशील पदार्थ असणाऱ्या पेट्रोल किंवा डिझेलची विक्री पंपाबाहेर केली जात असेल तर तो गंभीर गुन्हा ठरतो. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात पेट्रोल किंवा डिझेलची अशी खुलेआम विक्री चक्क किराणा दुकान आणि पानठेल्यांमधून होत असताना कुणावरही कारवाई होत नाही. त्यामुळे ज्वलनशील पदार्थ विक्रीसाठी असलेले नियम या तालुक्याला लागू होत नाही काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये मुलचेरा शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची खुली विक्री होत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. ६८ गावांच्या मुलचेरा तालुक्यात एकही पेट्रोल-डिझेल पंप नाही हे विशेष. अशी स्थिती असलेला महाराष्ट्रातील हा एकमेव तालुका असावा.
१५ आॅगस्ट १९९२ रोजी निर्माण झालेल्या या तालुक्यात गॅस एजन्सी, राष्ट्रयकृत बँकही आहे. तालुका म्हणून इतरही सरकारी कार्यालये आहेत. शेकडो चारचाकी वाहने व ट्रॅक्टर तथा हजारो दुचाकी वाहनधारक आहेत. मात्र त्यांच्यासाठी दररोज लागणारे शेकडो लिटर पेट्रोल-डिझेल चक्क चिल्लर विक्रीतून पुरविले जाते. त्यासाठी डिझेलच्या मोठ्या डबक्या काही दुकानांमध्ये भरून ठेवल्या जातात. त्यातून पाईपने छोट्या डबकीत डिझेल काढून ते वाहनात भरले जाते.
याच पद्धतीने पेट्रोलही पाण्याच्या एक लिटर बॉटलमधून उपलब्ध केले जाते. काही ठिकाणी पेट्रोलच्या एक-एक लिटरच्या बॉटल भरूनच ठेवलेल्या असतात. ग्राहकाने पेट्रोल मागितले की खालून एक बॉटल काढून दिली जाते. पेट्रोल गाडीत ओतल्यानंतर ती बॉटल पुन्हा दुकानदाराला परत द्यावी लागते.
काही ठिकाणी पेट्रोल साठवणुकीच्या कारवाईतून वाचण्यासाठी दुकानासमोर पेट्रोलने भरलेली मोटारसायकल उभी केली जाते. ग्राहकाने पेट्रोल मागितल्यानंतर मोटारसायकलमधून बॉटलमध्ये पेट्रोल काढून ते ग्राहकाच्या गाडीत टाकले जाते. अशा प्रकारच्या खुल्या विक्रीमुळे पेट्रोल-डिझेलमध्ये रॉकेलची भेसळही होते. मात्र दुसरा पर्याय नसल्यामुळे वाहनधारक त्याबद्दल कोणतीही कुरबूर करताना दिसत नाही.

दूर जाणे परवडणारे नाही
पंपावरूनच पेट्रोल किंवा डिझेल घेण्याचे वाहनधारकाने ठरविले तर सर्वात जवळचे ठिकाण आष्टी (२० किमी), आलापल्ली (३५ किमी) किंवा एटापल्लीला (३५ किमी) जावे लागते. ते परवडणारे नसल्यामुळे जास्त रक्कम देऊन वाहनधारक गावातूनच खरेदी करतात.

पेट्रोल-डिझेलची खुली विक्री करणे धोकादायकच आहे. पेट्रोलियम अ‍ॅक्टअंतर्गत तहसीलदार किंवा पोलीस अशी विक्री, साठा करणाऱ्यावर कारवाई करू शकतात. मात्र लोकांची सोय होत असल्यामुळे कुणी त्याविरुद्ध तक्रारही करत नाही.

पेट्रोलचा दर १०० रुपये
पंपावरील पेट्रोलचा दर आता ९० च्या घरात गेला असला तरी मुलचेरा तालुक्यात काही महिन्यांपासून पेट्रोल १०० रुपये दराने विकले जात आहे. पंपावरील दरापेक्षा १० रुपये जास्त दर असा अलिखित नियमच या तालुक्यात लागू आहे. त्यामुळे वाहनधारकही मुकाट्याने एका लिटरसाठी १०० ची नोट काढून देतात.
- एस.पी. खलाते, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली

Web Title: Here petrol is sold at grocery store and pan shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.