ठळक मुद्देप्राध्यापकांचीही वानवापदमान्यतेअभावी भरती प्रक्रिया थंडबस्त्यात

दिलीप दहेलकर ।
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यातील २०८ महाविद्यालयांपैकी १३० महाविद्यालयांमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नियमित प्राचार्य नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांच्या व्यवस्थापन व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यात एकूण २३८ महाविद्यालये होती. त्यापैकी विनाअनुदान तत्वावरील नाममात्र सुरू असलेल्या ३० महाविद्यालयांची मान्यता विद्यापीठ प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच काढली आहे. उर्वरित २०८ महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमात पदवी, पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. महाविद्यालयाचे प्रशासन योग्यरीत्या व नियमानुसार चालण्यासाठी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व गुणवत्ता टिकविण्यासाठी सर्व महाविद्यालयात नियमित प्राचार्य असणे गरजेचे आहे.
महाविद्यालयात विषयनिहाय प्राध्यापक व शाखानिहाय विभाग प्रमुख असणे शासन निर्णयानुसार आवश्यक आहे. मात्र या दोन्ही जिल्ह्यातील १३० महाविद्यालयांत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नियमित प्राचार्य नाही. अशा महाविद्यालयाचा कारभार कार्यकारी तसेच प्रभारी प्राचार्याच्या भरवशावर सुरू आहे.
या महाविद्यालयांमध्ये सद्य:स्थितीत १ हजार २८ प्राध्यापक कार्यरत आहेत. अनेक महाविद्यालयांत प्राध्यापकांची जवळपास ३०० वर पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
नियमित प्राचार्य व प्राध्यापकांची पदभरती करण्याबाबत गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने संबंधित महाविद्यालयांना दोन ते तीन वेळा नोटीस बजावली आहे. त्यानंतर नियमित प्राचार्य व प्राध्यापक भरण्याबाबत काही अनुदानित महाविद्यालयांनी हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती आहे.

पदमान्यतेअभावी भरती प्रक्रिया थंडबस्त्यात

पदभरती करण्याबाबत गोंडवाना विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना नोटीस बजावून सूचित केले होते. त्यानंतर काही अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांनी प्राचार्य व प्राध्यापक पदभरतीची प्रक्रिया हाती घेतली होती. मात्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सहसंचालकांकडून पद मान्यता देणे बंद केले आहे. नव्याने नियमित प्राचार्य व प्राध्यापकांना मान्यता मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात प्राचार्य व प्राध्यापकांची भरती प्रक्रिया थंडबस्त्यात आहे.