Gadchiroli and Gondia elephants will be shifted in Tadoba and Pench | गडचिरोली व गोंदियातील हत्तींचे होणार पेंच व ताडोबात स्थानांतर

ठळक मुद्देप्रधान मुख्य संरक्षकांचे निर्देशवाघाचा मागोवा घेण्याचे देणार प्रशिक्षण

श्रीधर दुग्गीरालापाटी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प येथील सात हत्ती पेंच व्याघ्र प्रकल्प व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील एक हत्ती ताडोबा व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे हत्ती कॅम्प आहे. या ठिकाणी वसंती, मंगला, अजित, राणी, प्रियंका व आदित्य हे सात हत्ती आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात रूपा नावाची हत्तीन आहे. कमलापूर येथील सर्व हत्ती, त्यांच्यासाठी वापरले जाणारे प्रशिक्षण व इतर साहित्य तसेच उपलब्ध कर्मचारी यांचे पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे स्थानांतरण करावे, या सर्व हत्तींना पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मागोवा घेण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिले आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यापूर्वीच चार हत्ती आहेत. नवेगाव-नागझिरा येथील एक हत्ती त्या ठिकाणी स्थानांतरित केला जाणार असल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील हत्तींची संख्या पाचवर पोहोचणार आहे. नवीन हत्तीला सुद्धा वाघाचा मागोवा घेण्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सर्व हत्तींचे स्थानांतरण १५ फेब्रुवारीपूर्वी संबंधित ठिकाणी करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार वनविभाग तयारीला लागला आहे.

नागरिकांमध्ये संताप
कमलापूर येथील हत्ती कॅम्प हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव पर्यटनस्थळ आहे. राज्यभरातील अनेक पर्यटक हत्ती पाहण्यासाठी कमलापूर हत्ती कॅम्पला भेट देतात. वन विभागाने या सर्व हत्तींना लाकडाची वाहतूक करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले आहे. मात्र आता या सर्व हत्तींचे स्थानांतरण केले जाणार असल्याने कमलापूर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला जात आहे.