गडचिरोली व देसाईगंजमध्ये सभापती अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:42 PM2019-01-21T22:42:48+5:302019-01-21T22:43:28+5:30

एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असल्यामुळे गडचिरोली व देसाईगंज या दोन्ही नगर पालिकेत विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीसाठी सोमवारी विशेष सभा बोलाविण्यात आल्या. सदर दोन्ही नगर पालिकेत भाजपला बहुमत असल्याने या दोन्ही नगर पालिकेत सभापतींची निवड अविरोध करण्यात आली. गडचिरोली नगर पालिकेत महत्त्वाच्या दोन समित्यांवर जुन्याच सभापतींची पुनर्निवड करण्यात आली असून चार समित्यांवर नव्या नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे.

Gadchiroli and DesaiGanj are absent | गडचिरोली व देसाईगंजमध्ये सभापती अविरोध

गडचिरोली व देसाईगंजमध्ये सभापती अविरोध

Next
ठळक मुद्देदेसाईगंज न.प.मध्ये सर्वांचेच खांदेपालट : गडचिरोलीत दोन सभापतींची फेरनिवड, चार नवे चेहरे

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/देसाईगंज : एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असल्यामुळे गडचिरोली व देसाईगंज या दोन्ही नगर पालिकेत विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीसाठी सोमवारी विशेष सभा बोलाविण्यात आल्या. सदर दोन्ही नगर पालिकेत भाजपला बहुमत असल्याने या दोन्ही नगर पालिकेत सभापतींची निवड अविरोध करण्यात आली. गडचिरोली नगर पालिकेत महत्त्वाच्या दोन समित्यांवर जुन्याच सभापतींची पुनर्निवड करण्यात आली असून चार समित्यांवर नव्या नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे.
गडचिरोली व देसाईगंज या नगर पालिकेतील जुन्या सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ २३ जानेवारी रोजी संपुष्टात येणार आहे. २४ जानेवारीपासून पालिकेचे नवे सभापती कारभार सांभाळणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी विषय समितीच्या सभापती निवडीसाठी विशेष सभेचा कार्यक्रम जाहीर केला होता.
गडचिरोली नगर पालिकेतील भाजपचे गटनेते अनिल कुनघाडकर यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते यांच्या सल्ल्यानुसार सहा सभापती पदांसाठी सहा नगरसेवकांची नावे सहायक पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्याकडे सादर केली. त्यानंतर दुपारी २ वाजता पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार डी. एस. भोयर यांनी विशेष सभेला सुरूवात केली. एका सभापतीपदासाठी एकाच नगरसेवकाचे नाव नामनिर्देशित करण्यात आल्याने सहा नगरसेवकांची सहा समित्यांवर सभापती म्हणून अविरोध निवड करण्यात आली.
यामध्ये बांधकाम सभापतीपदी आनंद श्रुंगारपवार तर आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी पालिकेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांची अविरोध फेरनिवड करण्यात आली. गडचिरोली पालिकेत चार समित्यांवर नव्या नगरसेवकांना स्थान देण्यात आले. त्यात पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी मुक्तेश्वर काटवे, शिक्षण सभापतीपदी वर्षा वासुदेव बट्टे, महिला व बालकल्याण सभापतीपदी गीता पोटावी तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी प्रशांत खोब्रागडे यांची अविरोध निवड करण्यात आली.
सभापतींच्या निवडीनंतर भाजपचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पालिकेच्या परिसरात एकमेकांना पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, भुपेश कुळमेथे, प्रविण वाघरे, केशव निंबोड, संजय मेश्राम, सतीश विधाते, रमेश चौधरी यांच्यासह सर्वच २५ नगरसेवक उपस्थित होते.
देसाईगंज न.प. सभागृहात सोमवारी विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये भाजपचे गटनेते किसन नागदेवे यांची पाणी पुरवठा सभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली. आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी श्याम उईके, शिक्षण सभापतीपदी मनोज खोब्रागडे तर महिला व बालकल्याण सभापतीपदी किरण रामटेके यांची अविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष ज्या समितीचा पदसिद्ध सभापती असेल ती विषय समिती वगळण्यात आल्याने बांधकाम सभापतीची निवडणूक झाली नाही. पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार टी.जी.सोनवाने यांनी तर सहायक पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, मावळते सभापती सचिन खरकाटे, दीपक झरकर, करुणा गणवीर, आशा राऊत यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
अन् उपसभापतिपद गोठवले
गडचिरोली नगर पालिकेत यापूर्वी अनेकदा महिला व बाल कल्याण समितीचे उपसभापतीपद ठेवण्यात येत होते. गडचिरोली पालिकेत भाजपची पहिल्यांदाच सत्ता आल्यानंतर येथे महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदी दोन महिला नगरसेवकांची वर्णी लावण्यात आली होती. मात्र सोमवारी झालेल्या निवडणुकीत सदर समितीचे उपसभापतीपद गोठविण्यात आले. पक्षश्रेष्ठी व पालिकेतील नेत्यांचा उपसभापतीपद ठेवण्याचा विचार होता. तशा हालचालीही सुरू झाल्या. मात्र काही पुरूष व महिला नगरसेवकांनी महिला व बाल कल्याण समितीलाच उपसभापतीपद का, असा सवाल उपस्थित केला. उपसभापती द्यायचे असेल तर इतरही महत्त्वाच्या समित्यांवर अशा प्रकारचे उपसभापतीपद देण्यात यावे, असा सूर काढण्यात आला. त्यामुळे या निवडणुकीत महिला व बाल कल्याण समितीचे उपसभापतीपद निवडण्यात आले नाही.
दोन माजी नगराध्यक्ष झाले सभापती
देसाईगंज नगर पालिकेत सर्व विषय समित्यांच्या सभापतींची खांदेपालट झाली असली तरी दोन सभापतीपद दोन माजी नगराध्यक्षांनी पटकावल्याने हा चर्चेचा विषय होता. यामुळे सामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक झालेल्या अनेक इच्छुकांना आपल्या इच्छेला आवर घालावा लागल्याने त्यांच्यात काहीशी नाराजी आल्याचे दिसत होते.
पालिकेतील नवे सभापती
गडचिरोली

अनिल कुनघाडकर - आरोग्य व स्वच्छता
आनंद श्रुंगारपवार - बांधकाम
मुक्तेश्वर काटवे - पाणी पुरवठा
वर्षा वासुदेव बट्टे - शिक्षण
गीता पोटावी - महिला व बाल कल्याण
प्रशांत खोब्रागडे - नियोजन व विकास

देसाईगंज
किसन नागदेवे - पाणी पुरवठा
शाम उईके - आरोग्य व स्वच्छता
मनोज खोब्रागडे - शिक्षण
किरण रामटेके - महिला व बाल कल्याण

Web Title: Gadchiroli and DesaiGanj are absent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.