ठळक मुद्देआतील भाग नष्ट होण्याच्या मार्गावरवैरागडचा किल्ला

आॅनलाईन लोकमत
वैरागड : आरमोरी तालुक्यातील वैरागड किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पुरातत्व विभागाकडून निधी मंजूर केला जातो. मागील पाच वर्षांपासून बहुतांश निधी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची डागडुजी करण्यावरच खर्च केला जात आहे. त्यामुळे नागरिकही आश्चर्यचकीत झाले आहेत.
वैरागड गावाच्या उत्तरेला १२ एकर जागेत किल्ल्याचे बांधकाम झाले आहे. इसवी सन १२ व्या शतकात तत्कालीन गोंड राजा बाबाजी बल्लाळशाहने वैरागड येथे असलेल्या हिऱ्याच्या खाणींच्या संरक्षणार्थ सदर किल्ला बांधला आहे, असा उल्लेख इतिहासात मिळतो. एवढा मोठा कालखंड उलटून गेल्यानंतर आजही किल्ल्याचे तट, बुरूज कायम आहेत. बरेच वर्ष किल्ल्याच्या देखभालीकडे पुरातत्व विभागाने लक्ष न दिल्याने किल्ल्याचा बराच भाग भूईसपाट झाला. ऐतिहासीक वास्तू पुन्हा नव्याने निर्माण करणे शक्य नसल्याने या दुर्मिळ वास्तूची देखभाल करणे आवश्यक असताना किल्ल्याच्या देखभाालीकडे पुरातत्व विभाग पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याचे दिसून येते. मागील पाच वर्षांपासून दरवर्षी किल्ल्याच्या देखभाल व दुरूस्तीसाठी पुरातत्व विभागाकडून निधी मंजूर केला जात आहे. मात्र यातील बहुतांश निधी केवळ प्रवेशद्वाराच्या दुरूस्तीवरच खर्च केला जात आहे. किल्ल्याच्या आत तट, बुरूज आहेत. त्यांचीही दुरूस्ती होणे आवश्यक आहे. किल्ल्याच्या आंतरभागातील इतरही वास्तूंची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे, दुरूस्तीचे काम नेमक्या कोणत्या कंत्राटदाराला दिले जाते, हे गोपनिय ठेवले जाते. त्यामुळे पुरातत्व विभाग व कंत्राटदार यांची मिलिभगत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.