तीन हजार क्विंटलची अवाजवी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:37 AM2017-11-23T00:37:07+5:302017-11-23T00:37:31+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत गतवर्षी सन २०१६-१७ च्या खरीप व रबी हंगामात एकूण ५ लाख ३८ हजार ५४३ क्विंटल धान खरेदी करण्यात आली.

Excessive drop of three thousand quintals | तीन हजार क्विंटलची अवाजवी घट

तीन हजार क्विंटलची अवाजवी घट

Next
ठळक मुद्देगतवर्षीचा धान खरेदी हंगाम : आविका संस्थांच्या कमिशनमधून ६९ लाख रूपये कपात होणार

ऑनलाईन लोकमत 
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत गतवर्षी सन २०१६-१७ च्या खरीप व रबी हंगामात एकूण ५ लाख ३८ हजार ५४३ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. त्यापैकी धानाची उचल होईपर्यंत केंद्रांवर ३ हजार १३५ क्विंटल धानाची अवाजवी घट आढळून आली आहे. या घटीपोटी महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने संबंधित संस्थांच्या कमिशनमधून ६९ लाख १४ हजार ३०६ रूपये कपात करण्यात येणार आहेत.
कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कुरखेडा, सोनसरी व पलसगड या तीन संस्थांच्या केंद्रांवर एकूण ४०२.५९ क्विंटल इतकी अवाजवी घट आढळून आली आहे. अवाजवी घट आढळून आलेल्या या धानाची किंमत ८ लाख ८७ हजार ७१० रूपये इतकी आहे. कोरची उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मसेली, कोरची, बेतकाठी, बोरी, मर्केकसा, बेडगाव, कोट्रा, कोटगूल, खेडेगाव, येंगलखेडा व गॅरापत्ती या संस्थांच्या केंद्रांवर सन २०१६-१७ च्या हंगामात एकूण १ हजार २६६ क्विंटलची अवाजवी घट आढळून आली. या धानाची किंमत २७ लाख ९२ हजार ६९८ रूपये इतकी आहे. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत उराडी, कुरंडीमाल, पिंपळगाव, चांदाळा, विहिरगाव व पोटेगाव या संस्थांच्या केंद्रांवर एकूण २७५.६८ क्विंटल धानाची अवाजवी घट आढळून आली. या धानाची किंमत ६ लाख ७ हजार ८७४ रूपये आहे.
धानोरा उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सोडे, चातगाव, मुरूमगाव, धानोरा, दुधमाळा, वट्टा, पेंढरी व मोहली तसेच सुरसुंडी आदी संस्थांच्या केंद्रांवर १ हजार ११६ क्विंटल धानाची अवाजवी घट आढळून आली. या धानाची किंमत २४ लाख ६१ हजार २४२ रूपये आहे.
घोट उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मक्केपल्ली, अड्याळ, गुंडापल्ली व भाडभिडी (बी.) आदी ठिकाणच्या केंद्रांवर ७४.७३ क्विंटल धानाची अवाजवी घट आढळून आली. या धानाची किंमत १ लाख ६४ हजार ७८० रूपये आहे. ही सर्व रक्कम महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत संबंधित संस्थांच्या कमिशनमधून कपात करण्यात येणार आहे.
दोन टक्के घट शासनाकडून मान्य
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात धानाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या कामापोटी संबंधित आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना प्रती क्विंटल ३० टक्के कमिशन दिले जाते. कमिशनची १५ टक्के रक्कम हुंडीमधून कपात केली जाते. उर्वरित १५ टक्के रक्कम हंगाम आटोपल्यानंतर संबंधित संस्थांना कमिशनपोटी अदा केले जाते. मात्र ज्या संस्थांच्या केंद्रांवर अवाजवी घट आढळून आली आहे, या घटीची रक्कम संबंधित संस्थांच्या कमिशनमधून कपात केली जाणार आहे.
कोेटगूल व गॅरापत्ती केंद्रावर सर्वाधिक घट
कोरची तालुक्यातील कोटगूल व गॅरापत्ती केंद्रांवर आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या वतीने सन २०१६-१७ च्या खरीप व रब्बी हंगामात धान खरेदी करण्यात आली. गॅरापत्ती येथील केंद्रावर सर्वाधिक ८.४१ टक्के इतक्या धानाची अवाजवी घट आढळून आली आहे. त्या खालोखाल कोटगूल केंद्रावर ६.७० टक्के इतकी खरेदी केलेल्या धानात घट आढळून आली आहे. खरेदी केल्यानंतर धानाची उचल होईपर्यंत साठवणूक व देखभाल योग्यरित्या न केल्याने ही घट आली आहे.

Web Title: Excessive drop of three thousand quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.