पेरमिली तालुक्यासाठी चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:22 AM2019-06-13T00:22:03+5:302019-06-13T00:22:26+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्य, अहेरी जिल्हा निर्माण करून पेरमिली गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी पेरमिली परिसरातील ३० गावातील नागरिकांनी एकजूट होऊन बुधवारी पेरमिली येथे चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले.

Charkkajam for Parimali taluka | पेरमिली तालुक्यासाठी चक्काजाम

पेरमिली तालुक्यासाठी चक्काजाम

Next
ठळक मुद्देमूलभूत सोयी पुरवा : ३० गावातील नागरिकांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
पेरमिली : स्वतंत्र विदर्भ राज्य, अहेरी जिल्हा निर्माण करून पेरमिली गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी पेरमिली परिसरातील ३० गावातील नागरिकांनी एकजूट होऊन बुधवारी पेरमिली येथे चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले.
अहेरी उपविभाग विस्ताराने मोठा आहे. जिल्हा मुख्यालयात पोहोचण्यासाठी फार मोठे अंतर पार करावे लागते. परिणामी उपविभागात अनेक मूलभूत समस्या आहेत. पेरमिली परिसरसुद्धा यापासून सुटलेला नाही. या भागात वीज, रस्ते, आरोग्य, सिंचन, शिक्षण आदी बाबतीत समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अहेरीला जिल्ह्याचा दर्जा देणे आवश्यक आहे. यासह स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करून पेरमिलीला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. चक्काजाम आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना व शासनाला पाठविण्यात आले.
या निवेदनात पेरमिली येथे ३३ केव्ही उपकेंद्र निर्माण करावे, सहकारी बँकेची शाखा स्थापन करावी, वरिष्ठ महाविद्यालय, आयटीआयची निर्मिती करावी, पेरमिली येथे महसूल मंडळ व नायब तहसीलदार कार्यालय द्यावे, ग्राहकांसाठी फोर-जी सेवा उपलब्ध करावी, शासकीय आश्रमशाळांतील रिक्त पदे भरावी, कचलेर व हिंदभट्टी येथे विद्युत पुरवठा करावा, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत आवश्यक गावांमध्ये नळ योजना कार्यान्वित करावी आदी मागण्यांचा यात समावेश होता.
आंदोलनस्थळी अहेरीचे नायब तहसीलदार घुये व महावितरण कंपनीचे प्रभारी अभियंता बावनथडे यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारले.
या आंदोलनात पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम, उपसरपंच साजन गावडे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत दुर्गे, आसिफ खान पठाण, डॉ. शंकर दुर्गे, कविश्वर चंदनखेडे, तुळशीराम चंदनखेडे, श्रीकांत बंडमवार, तुकेश कुंभारे, विनोद आत्राम, अमर गावडे, रवी औतकर, अमोल मारकवार व परिसराच्या ३० गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तर तीव्र आंदोलन करणार
अनेक वर्षांपासून पेरमिली तालुक्याच्या निर्मितीसाठी आंदोलने करून निवेदने दिली जात आहेत. परंतु या मागणीकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी नागरिकांच्या वतीने देण्यात आला. बुधवारी जवळपास ७ तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याच दिवशी भामरागडचा आठवडी बाजार होता. त्यामुळे दूरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Web Title: Charkkajam for Parimali taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप