‘उन्नत भारत’ने ग्रामीण भागाशी जोडली विद्यार्थ्यांची नाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:59 PM2018-10-15T22:59:27+5:302018-10-15T22:59:50+5:30

केंद्र शासनाच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयामार्फत उन्नत भारत हा अभियान राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाच गावांमधील कुटुुंबांचे सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे.

'Advanced India' students' group of rural areas | ‘उन्नत भारत’ने ग्रामीण भागाशी जोडली विद्यार्थ्यांची नाळ

‘उन्नत भारत’ने ग्रामीण भागाशी जोडली विद्यार्थ्यांची नाळ

Next
ठळक मुद्देमुनघाटे महाविद्यालयाचा उपक्रम : पाच गावांचा सर्वे करून अहवाल शासनाकडे सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : केंद्र शासनाच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयामार्फत उन्नत भारत हा अभियान राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाच गावांमधील कुटुुंबांचे सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाण होण्यास मदत झाली आहे.
महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी व्हावा. त्याबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नाळ या माध्यमातून ग्रामीण भागाशी जोडण्यास मदत होईल. या उद्देशाने शासनाने उन्नत भारत हा अभियान सुरू केला आहे. या अभियानासाठी कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे.
उन्नत भारत अभियानाची सुरूवात करण्यासाठी महाविद्यालयाने कुरखेडा तालुक्यातील पाच गावांची निवड करून मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. निवडलेल्या पाच गावांमध्ये नवरगाव(आंधळी), नान्ही, धमदीटोला, जांभूळखेडा व येरंडी यांचा समावेश आहे. यासाठी महाविद्यालयाने समन्वयक म्हणून प्रा. डॉ. दीपक बन्सोड, सह-समन्वयक म्हणून प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. अमित रामटेके, प्रा. डॉ. गुणवंत वडपल्लीवार, प्रा. डॉ. रवींद्र विखार, प्रा.संजय महाजन व प्रा. राखी शंभरकर यांची नियुक्ती केली आहे.
पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाने निवड केलेल्या पाचही गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर प्रश्नावलीच्या माध्यमातून गावात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, ग्रामस्थांना झालेला लाभ, ग्रामीण समस्या, आर्थिक स्तर, कुटुंबाची संपूर्ण माहिती याची माहिती गोळा करण्यात आली.
ग्रामीण भागात प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव, कष्टदायी जीवन, पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतीतील अडचणी, प्राथमिक शिक्षणाची दुरावस्था, गावात जाण्यासाठी रस्त्याचा अभाव, रोजगाराचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना दारिद्र्यात जीवन जगावे लागत आहे. या सर्व विपरित परिस्थितीमुळे युवक वर्गाचा ओढा शहराकडे वाढत चालला आहे. परिणामी ग्रामीण भाग ओस पडत चालला आहे. याचे दुरगामी परिणाम भविष्यात शहर व ग्रामीण भागातील जनतेलाही भोगावे लागणार आहेत. ग्रामीण भाग सक्षम झाल्यास शहरात येणारे युवकांचे लोंढे थांबविण्यास मदत होईल, यासाठी सर्वप्रथम समस्यांची जाण होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने उन्नत भारत हा अभियान राबविला जात आहे.
विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालाचे मूल्यांकन झाल्यानंतर त्यानुसार ग्रामीण भागासाठी योजना राबविण्यास शासनाला मदत होणार आहे.
मोजक्याच महाविद्यालयांची निवड
उन्नत भारत अभियानासाठी केंद्र शासनाच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयामार्फत देशातील मोजक्या २५० महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाची निवड झाली आहे. विशेष म्हणजे गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून या अभियानासाठी निवड झालेले हे एकमेव महाविद्यालय आहे.

उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी ग्रामीण भागाच्या समस्यांचे निराकरण करणारे दूत ठरणार आहेत. शासनाच्या विविध योजना ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या विकासात हातभार लावण्याकरिता श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय प्रयत्नशील आहे.
- डॉ.राजाभाऊ मुनघाटे, प्राचार्य, श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय, कुरखेडा

Web Title: 'Advanced India' students' group of rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.