40 thousand fragrant tobacco seized | ४० हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त
४० हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त

ठळक मुद्देआलापल्लीत कारवाई : ८० डबे भरलेल्या पोत्याची बसमधून वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : नागपूर-सिरोंचा बसमधून सुमारे ४० हजार रूपयांचा सुगंधित तंबाखू अहेरी पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आलापल्ली येथे करण्यात आली.
नागपूर आगाराची बस चंद्रपूर-बल्लारपूर-गोंडपिपरी-आष्टी मार्गे सिरोंचाकडे जात होती. दरम्यान गोंडपिपरी येथे सुगंधित तंबाखूचा पोता बसमध्ये ठेवला. याबाबतची गोपनीय माहिती आलापल्लीचे वाहतूक पोलीस हवालदार बेगलाजी दुर्गे यांना प्राप्त झाली. सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनात आलापल्ली येथे बस थांबवून पाहणी केली असता, बसमध्ये सुगंधित तंबाखू भरलेले पोते आढळून आले. पोते उतरवून पोलिसांनी बसचालक व वाहक यांना ताब्यात घेतले. सदर सुगंधित तंबाखू गोंडपिपरी येथील सागर चर्लावार यांनी बसमध्ये चढविल्याचे सांगितले. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पोलिसांनी चर्लावार याला चौकशीसाठी बोलविले आहे. सदर सुगंधित तंबाखू नेमका कुणाला पोहोचवायचा होता, हे स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे ८० डब्यांचा पोता एसटीच्या वर ठेवणे आवश्यक असतानाही बस वाहकाने सदर पोता सिटच्या खाली ठेवण्यास कशी काय परवानगी दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून वाहक सुद्धा या प्रकरणात दोषी असल्याचे दिसून येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाळाजी शिंदे, वाहतूक पोलीस हवालदार बेगला दुर्गे करीत आहेत.


Web Title: 40 thousand fragrant tobacco seized
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.