2.38 lakh laborers in Gadchiroli are inefficient! | गडचिरोलीतील रोहयोवरील २.३८ लाख मजूर अकार्यक्षम !

ठळक मुद्देनोंदणी करून दोन वर्षात एकदाही कामावर हजर नाही

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : सिंचनाच्या अपुऱ्या सुविधेमुळे शेतीची बारमाही कामे नसताना आणि रोजगाराची इतर साधनेही नसताना गडचिरोली जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर जाण्यास मजूरवर्ग इच्छुक नाही. रोजगार हमीच्या कामांसाठी नोंदणी केल्यानंतर गेल्या दोन वर्षात एकाही कामावर न जाणारे जिल्ह्यात तब्बल २ लाख ३८ हजार ७ मजूर आहेत. या सर्व मजुरांना अकार्यक्षम ठरविण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ७२ हजार १३५ कुटुंबांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर जाण्यासाठी नोंदणी केली. त्या कुटुंबांमधील मजूरसंख्या ५ लाख १२ हजार ८३७ आहे. परंतू गेल्या दोन वर्षात त्यापैकी २ लाख ७४ हजार ८३० मजुरांनीच रोहयोच्या कामांवर जाणे पसंत केले. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत ६२ हजार ५७५ कुटुंबांमधील १ लाख २७ हजार ६२६ मजुरांना या योजनेअंतर्गत रोजगार देण्यात आला आहे. त्यापैकी २५१४ कुटुंबांमधील १० हजार ८९६ सदस्यांनी १०० दिवसांचा रोजगार पूर्ण केला आहे.
या आर्थिक वर्षात आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ८० कोटी २० लाख रुपये रोजगार हमीच्या कामांवर खर्च करण्यात आले आहेत. प्रशासनाने मोठ्या प्रमाणात विविध यंत्रणांमार्फत कामे मंजूर करून ठेवली असली तरी या कामांवर येण्यास मजूर पाहिजे त्या प्रमाणात उत्सुक दिसत नाही. याऊलट काही मजूर तेलंगणा, आंध्र प्रदेश किंवा छत्तीसगड राज्यात मजुरीसाठी जात आहेत.


२२,३२१ मजुरांची नोंदणी रद्द
यावर्षी अकार्यक्षम असणाºया ५७०९ कुटुंबांमधील २२ हजार ३२१ सदस्यांची रोहयोच्या कामावर मजूर म्हणून येण्यासाठी केलेली नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
दुसरीकडे ३९२४ कुटुंबांमधील ९ हजार ३७२ सदस्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली आहे. सध्या रोहयोच्या कामासाठी १ लाख ६३ हजार ३०३ कुटुंबांकडे कार्यक्षम मजूर म्हणून जॉब कार्ड आहे.