१४७ दुकानदारांची खत विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:08 PM2018-07-16T23:08:56+5:302018-07-16T23:09:11+5:30

खतविक्रीसाठी पॉस (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन सक्तीची केल्याने यावर्षी नोंदणीकृत १४७ दुकानदारांनी खतविक्रीकडे पाठ फिरविली आहे.

147 shoppers closed the sale | १४७ दुकानदारांची खत विक्री बंद

१४७ दुकानदारांची खत विक्री बंद

Next
ठळक मुद्देपॉस मशीनचा परिणाम : जिल्हाभरात ३५३ दुकानदार करीत आहेत खताची विक्री

दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खतविक्रीसाठी पॉस (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन सक्तीची केल्याने यावर्षी नोंदणीकृत १४७ दुकानदारांनी खतविक्रीकडे पाठ फिरविली आहे.
केंद्र शासन रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात अनुदान देते. यापूर्वी कंपनीने खतविक्रीचे बिल सादर केल्यानंतर संबंधित कंपनीला अनुदानाचा लाभ दिला जात होता. याचा गैरफायदा खत कंपन्या उचलत होत्या. आगाऊ विक्री दाखवून अनुदान लाटले जात होते. या प्रकारावर आळा घालण्यासाठी मागील वर्षीपासून शासनाने खतविक्रीसाठी पॉस मशीन सक्तीची केली आहे. पॉस मशीनमध्ये संबंधित शेतकऱ्याचा आधारकार्ड क्रमांक टाकला जातो व त्याचे थम्बही घेतले जाते. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय खतावरील अनुदान संबंधित कंपनीला मिळत नाही. त्यामुळे खतविक्रीसाठी केंद्र शासनाबरोबरच कंपन्यांनीही पॉस मशीनची सक्ती केली आहे.
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे नोंदणी केल्यानंतर खत विक्रीचा परवाना मिळत होता. या परवान्यावर खतविक्री केली जात होती. जिल्हाभरात ५०० खते विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी मागील वर्षी ३१४ व यावर्षी ३९ खतविक्रेत्यांनी पॉस मशीन खरेदी केली आहे. याचा अर्थ एवढेच दुकानदार खताची विक्री करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. १४७ दुकानदारांनी खतविक्रीचा व्यवसाय बंद केला असण्याची शक्यता आहे.
पॉस मशीनचा वापर करण्यासाठी इंटरनेट सुविधा असणे आवश्यक आहे. दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये अजूनही इंटरनेटसेवा पोहोचली नाही. त्यामुळे पॉस मशीन काम करीत नसल्याने दुकानदारांना खतविक्रीच्या व्यवसायावर पाणी फेरावे लागले आहे. गावकऱ्यांनाही आता तालुकास्थळावरून खताची खरेदी करावी लागत आहे. पॉस मशीनमधूनच खताचे बिलही निघत असल्याने दुकानदार अधिकचे पैसे संबंधित शेतकऱ्याकडून घेऊ शकत नाही. परिणामी यापूर्वी शेतकऱ्यांची होणारी फसवणूकही थांबली असल्याने शेतकऱ्यांनीही या योजनेचे कौतुक केले आहे.
युरियाच्या बॅगचे वजन यावर्षीपासून ४५ किलो
युरियाची बॅग जरी शेतकऱ्यांना २७० रूपयांना मिळत असली तरी शासन या बॅगवर कंपनीला ४०० ते ५०० रूपयांचे अनुदान देते. कमी किमतीत खत मिळत असल्याने शेतकरी सर्वाधिक युरियाचा वापर करतात. युरिया हे रासायनिक खत आहे. रासायनिक खताचे जमीन व मानवी आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होण्याचा सर्वाधिक धोका राहतो. त्यामुळे रासायनिक खताचा वापर कमी होण्याच्या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. शेतकाऱ्यांना प्रती एकरी दोन ते तीन बॅग टाकण्याची सवय झाली आहे. बॅगचे वजन कमी केल्यास खताचा वापरही कमी होईल, अशी आशा शासनाला आहे. त्यामुळे शासनाने यावर्षीपासून युरियाच्या बॅगचे वजन ५० किलो ऐवजी ४५ किलो केले आहे.
रासायनिक खताचा वापर टाळून शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळविण्यासाठी शासनामार्फत शेतकºयांना मार्गदर्शन व अनुदानही दिले जात आहे.

Web Title: 147 shoppers closed the sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.